मागील काही वर्षांमध्ये स्मार्टफोन्सच्या वापरामध्ये विलक्षण प्रमाणात वाढ झाली आहे. आजकाल लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक जण फोनमध्ये गुंतलेला असल्याचे पाहायला मिळते. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे झोपेवर, स्मरणशक्तीवर आणि बौद्धिक क्षमतेवर परिणाम होऊ शकतो असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. अलीकडच्या काळात सांधेदुखीसह स्नायूंशी संबंधित अनेक समस्या वाढल्या आहेत. लहान मुले स्मार्टफोनचा गरजेपेक्षा जास्त वापर करत आहेत. त्यामुळे लहान मुलांमध्ये हे स्नायूंशी संबंधित आजार वाढत असल्याचे पाहायला मिळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“स्मार्टफोन हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. लोक ऑफिसचे काम करण्यासाठी, सोशल मीडिया वापरण्यासाठी अशा असंख्य कामांसाठी फोनचा वापर करत असतात. मोबाइल फोनचा दीर्घकाळ वापर केल्याने एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. स्नायूंसंबंधित आजार या नकारात्मक परिणामांपैकीच असू शकतात,” असे गुरुग्रामच्या मणिपाल हॉस्पिटलच्या संधिवातशास्त्र विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. शालू भसीन गगनेजा यांनी म्हटले आहे.

डॉ. शालू यांनी स्मार्टफोनच्या वापरामुळे होणाऱ्या समस्यांविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

मान आणि खांदे दुखणे.

दररोज दोन ते तीन तासांपेक्षा जास्त वेळ स्मार्टफोन वापरल्याने मान, खांदे असे अवयव दुखू शकतात. त्याशिवाय पाठदुखीचा त्रासदेखील होऊ शकतो. झोपून फोन वापरत असल्यास हा त्रास वाढू शकतो.

Osteoarthritis चा धोका वाढतो.

सतत मोबाइलवर टायपिंग केल्याने हातांच्या हाडांमधील First carpometacarpal joint चा Osteoarthritis होण्याची शक्यता असते. सोप्या शब्दात हातांमधील स्नायू आणि हाडांमध्ये वेदना व्हायला लागतात. हा आजार एका विशिष्ट वयानंतर होतो. पण मागील काही वर्षांत अनेक तरुण या समस्येचा सामना करत असल्याचे पाहायला मिळते.

आणखी वाचा – मुंबईच्या आरोग्याची धक्कादायक आकडेवारी; हृदयविकाराने रोज २६ तर कर्करोगामुळे २५ जणांचा मृत्यू!

De Quervain’s tenosynovitis हा त्रास होऊ शकतो.

मोबाइल फोनचा अतिवापर केल्याने मनगटाच्या मधल्या भागामध्ये वेदना होण्याची शक्यता असते. असे झाल्याने तळहाताची हालचाल करणे कठीण होते. De Quervain’s tenosynovitis मुळे अंगठ्याच्या स्नायूवर ताण येतो.

क्रॅम्प येणे आणि कोपर दुखणे.

स्मार्टफोन सतत हातांमध्ये पकडून ठेवल्याने हाताला क्रॅम्प येऊ शकतो. कोपर वाकलेले असल्याने त्याला दुखापत होऊ शकते.

Hand-arm vibration syndrome

जी मुले मोबाइल फोनवर तासनतास व्हिडीओ गेम्स खेळत असतात, त्यांच्यामध्ये Hand-arm vibration syndrome निर्माण होऊ शकतो. या स्थितीमुळे मुले जेव्हा मोबाइल वापरतात, तेव्हा त्यांच्या हातांमध्ये असह्य वेदना होत असतात.

आणखी वाचा – Burnt Tongue : जेवताना जीभ भाजली? तर मग लगेच करा ‘हे’ चार सोपे उपाय; जाणून घ्या सविस्तर

स्नायू आणि हाडांवर ताण येतो.

सतत स्मार्टफोन वापरल्यामुळे हात आणि मनगटांमध्ये वेदना होतात. तेव्हा हातांना मुंग्या येणे, हात सुन्न पडणे अशा गोष्टी घडू शकतात. स्मार्टफोन हातांमध्ये पकडून राहिल्याने स्नायू आणि हाडांवर ताण येत असतो.

या समस्यांचा सामना करायला लागू नये यासाठी स्मार्टफोन्सचा वापर कमी करावा, असे डॉ. शालू भसीन गगनेजा यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Excessive use of smartphones 6 body joint related issues that happens because of smartphone overuse know more yps