नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार मानसिक आरोग्य हा सध्या अतिशय महत्त्वाचा मुद्दा असून आठ व्यक्तींपैकी एक या समस्येने ग्रस्त आहे. विशेष म्हणजे वयोवृद्धांप्रमाणेच लहान मुलांनाही या समस्येने ग्रासलेले दिसते. या पार्श्वभूमीवर जगभरात मानसिक आरोग्यावर मात करण्यासाठी उपयुक्त औषधे आणि उपचार पद्धतीबाबत संशोधन सुरू आहे.
मानसिक आरोग्यासंदर्भात ‘साऊथ ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटी’ने केलेले संशोधन लक्षवेधी ठरले आहे. मानसिक रोगावरील विशेषत: नैराश्यावरील उपचारांपेक्षा व्यायाम आणि शारीरिक सक्रियता ही दीडपट अधिक उपयुक्त ठरते, असे या संशोधनानंतर स्पष्ट झाले.
शारीरिकदृष्टय़ा सक्रिय असलेल्या व्यक्ती या नैराश्याबरोबरच दु:ख, तणावाला कमी बळी पडतात. त्याचबरोबर सलग आठवडे व्यायाम केल्यानंतर मानसिक आरोग्य सुधारते. जलद चालणे, सायकल चालवणे, पोहणे आदी व्यायाम हे मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त आहेत, असेही या संशोधनामुळे अधोरेखित झाले. मानसिक आरोग्यासाठी भारतामध्ये योगासने लोकप्रिय आहेत. त्याचा मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्यावरही चांगला परिणाम होतो, हे या पूर्वीच्या अनेक संशोधनांमध्ये दिसून आले आहे.