शैलजा तिवले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्षयरोग म्हटला की खोकला हेच लक्षण प्रामुख्याने परिचित आहे; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये क्षयरोगाचे स्वरूप इतके बदलले आहे की, फुप्फुसांव्यतिरिक्त शरीरातील अन्य अवयवांवरही परिणाम करत आहे. विशेषत: बालकांमध्ये अशा प्रकारच्या क्षयाचे प्रमाण वाढले आहे. 

मुंबईसारख्या शहरामध्ये गेली अनेक वर्षे टीबी म्हणजेच क्षयरोगाचा आजार फोफावत असून आता बालकांमध्येही टीबीची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. टीबी हा हवेतून प्रसार होणारा आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की डोके वर काढणारा आजार. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे घरामध्ये कोणाला टीबी झाल्यास घरातील बालकांना टीबी होण्याची संभावना जास्त असते. त्यात एचआयव्हीबाधित, कुपोषित आणि रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे घेत असलेली बालके यांना तर टीबीची लागण होण्याची धोका जास्त असतो. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.

  • फुप्फुसांव्यतिरिक्त क्षयरोग

ज्या बालकांना फुप्फुसांचा क्षयरोग (प्लमनरी टीबी) होतो, त्यांच्यामध्ये प्रामुख्याने दोन आठवडय़ांहून अधिक खोकला ही लक्षणे असतात. मागील काही वर्षांमध्ये बालकांमध्ये फुप्फुसांव्यतिरिक्त शरीराच्या इतर भागांमध्ये (एक्स्ट्रा पल्मनरी) टीबीची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या टीबीची लागण झालेल्या बालकांमध्ये ६६ टक्के जणांना एक्स्ट्रा पल्मनरी टीबीची बाधा होत असून उर्वरित बालकांमध्ये फुप्फुसांचा टीबी आढळत असल्याचे वाडिया रुग्णालयातील बालरोग आणि साथरोगतज्ज्ञ डॉ. इरा शाह सांगतात. यामध्ये मेंदू, हाडे, लिम्फनोड, पोटाचा हे टीबीचे प्रकार प्रामुख्याने आढळत आहेत.

  • निदानातील अडथळे

फुप्फुसांचा टीबी असल्यास लहान मुले बडका काढू शकत नाही. त्यामुळे या बालकांमध्ये थुंकीची तपासणी करता येत नाही. बालकांमध्ये गॅस्ट्रिक एस्पिरेट पद्धतीने थुंकीचे नमुने घ्यावे लागतात. फुप्फुसाव्यतिरिक्त इतर भागाचा टीबी असल्याचा संशय असल्यास त्या भागाची बायोप्सी करावी लागते. ही तपासणी खर्चीक असून मुलांमध्ये करणे थोडे अवघड असते, असे साथरोगतज्ज्ञ डॉ. तनु सिंघल सांगतात.

  • एमडीआर किंवा एक्सडीआर टीबी

बालकांमध्ये औषधांना दाद न देणाऱ्या (ड्रग रेझिस्टंट-डीआर) टीबीचे प्रमाणही वाढत आहे. मुंबईत बालकांमध्ये या टीबीचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्याचे डॉ. शाह सांगतात. आमच्याकडे येणाऱ्या बालकांमध्ये टीबीची तीव्रता वाढलेली असते. त्यामुळे त्यांना कमी कालावधीच्या औषधोपचारावर ठेवण्याचा पर्यायच उपलब्ध नसतो. परिणामी बहुतांश बालकांना किमान १८ महिने औषधोपचार घ्यावे लागतात, असेही पुढे डॉ. शाह स्पष्ट करतात.

  • औषधोपचार पूर्ण करणे अधिक आव्हानात्मक

टीबीच्या औषधोपचाराचा कालावधी बराच मोठा असल्यामुळे बालकांमध्ये उपचार पूर्ण करणे अधिक आव्हानात्मक असते. डीआर टीबीची औषधांची संख्याही जास्त असते आणि जवळपास किमान १८ महिने घ्यावे लागत असल्यामुळे या बालकांमध्ये तर आणखीच गंभीर स्थिती असते. ‘डीआर टीबीमध्ये नव्या उपचार पद्धतीमध्ये इंजेक्शन न घ्यावे लागले तरी गोळय़ा या सुरूच ठेवाव्या लागतात. एका वेळेस बालकांना किमान सात ते आठ गोळय़ा खाव्या लागतात. दररोज एवढय़ा गोळय़ा खाणे हे मुलांसाठी त्रासदायक असते. किशोरवयातील मुले औषधे घेण्यास तयार नसतात. त्यामुळे पालकांनाही बालकांचे उपचार पूर्ण करून घेणे अधिक कष्टदायक असते  आणि टीबीची तीव्रता वाढते आणि याचे रूपांतरण अनेकदा एमडीआर किंवा एक्सडीआरमध्ये होते. अशा वेळी किशोरवयीन बालकांचे अनेक वेळा समुपदेशन करावे लागते. या मुलांनी उपचार पूर्ण करण्यासाठी कुटुंबाचेही समुपदेशन करण्याची आवश्यकता असते. यामध्ये मग आम्ही पालकांना त्यांच्या उपस्थितीमध्ये औषधे देण्याची जबाबदारी घेण्यास सांगतो, जेणेकरून वेळच्या वेळेत औषधे घेतली जातील,’ असे डॉ. शाह सांगतात.

औषधांबाबत अधिक सांगताना डॉ. शाह सांगतात, ‘बालकांना तोंडाद्वारे घ्यायची औषधे त्याच्या वयाला पूरक अशा मात्रेमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे मग काही वेळा मोठय़ांच्या औषधांचे विभाजन करून त्यांच्या मात्रेमध्ये द्यावे लागते. वाडियाचे टीबी केंद्र मोठे असल्यामुळे आम्हाला बालकांसाठी पूरक औषधे प्राप्त होतात; परंतु राज्यभरात अन्य ठिकाणी ही औषधे उपलब्ध नसल्यामुळे अडचणी येत आहेत. फुप्फुसांव्यतिरिक्तच्या टीबीमध्ये बालकांना इतर आजारांवरीलही औषधे द्यावी लागतात. एकावेळी अनेक औषधे घ्यावी लागत असल्यामुळे बालकांना ही औषधे देणेही पालकांसाठी आव्हानात्मक असते.’

  • औषधांचे दुष्परिणाम

मोठय़ांप्रमाणे बालकांमध्ये एमडीआर आणि एक्सडीआरचे उपचार सुरू असताना औषधांचे दुष्परिणाम आढळतात. इतर परिणामांसह बालकांमध्ये श्रवणसंस्थेवर परिणाम होत असल्याचे काही ठिकाणी आढळले आहे. बालकांमध्ये हे दुष्परिणाम हाताळणे अधिक अवघड असते. अगदी लहान बालकांना सांगताही येत नसल्यामुळे दुष्परिणाम ओळखणेही अनेकदा अवघड असते.

  • प्रतिबंधात्मक उपाययोजना

घरामध्ये प्रौढ व्यक्तीला टीबी झालेला असल्यास बालकांना टीबी लागण होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी औषधोपचारही उपलब्ध आहेत. या उपचारांना आयसोनियाझिड प्रिव्हेन्टिव्ह थेरपी (आयपीटी) म्हटले जाते. हे उपचार सहा महिने दररोज घ्यावे लागतात; परंतु प्रौढांना लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या तपासण्या तत्परतेने केल्या जात नाहीत. तसेच बालकांना प्रतिबंधात्मक उपचारही सुरू केले जात नाहीत. त्यामुळे बालकांनाही यांच्यामार्फत बाधा होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या बालकांना सहा महिन्यांसाठीची प्रतिबंधात्मक औषधे लवकरात लवकर सुरू केल्यास टीबीची लागण होणार नाही, असे डॉ. सिंघल यांनी व्यक्त केले.

  • लक्षणे

’ दोन आठवडय़ांहून अधिक काळ खोकला किंवा ताप येणे

’ वजन न वाढणे किंवा कमी होणे

’ खाण्याची इच्छा नसणे

’ डोकेदुखी, पाठदुखी, उलटय़ा होणे

’ लिम्फनोडला सूज येणे

’ रात्रीच्या वेळी घाम येणे

  • बालकांना टीबी होण्याचे जोखमीचे घटक

’ फुप्फुसाचा टीबी असलेल्या रुग्णाच्या घरातील बालके

’ एचआयव्हीबाधित बालके

’ कुपोषित बालके

  • या बालकांना आयटीपी गरजेचे

’ फुप्फुसाचा टीबी असलेल्या रुग्णाच्या संपर्कातील सहा वर्षांखालील बालके

’ सर्व एचआयव्हीबाधित बालके

’ रोगप्रतिकारशक्ती कमी होणारी औषधे घेत असलेली बालके

’ गर्भधारणेदरम्यान टीबीचे निदान झालेल्या मातेला झालेली मुले