आजची पिढी ही टेक्नोसॅव्ही असल्याचं म्हटलं जातं. इंटरनेट आणि गॅजेट्सच्या दुनियेत ही पिढी अगदी मुक्त संचार करत आहे. पण आता पुढच्या पिढीला देखील अगदी लहान वयातच या गॅजेट्स आणि ऑनलाईन विश्वाची भुरळ पडली आहे. अनेक लहान मुलं आपल्या पालकांकडे ऑनलाईन जगात येण्यासाठी, सोशल मीडियावर अकाऊंट्स उघडण्यासाठी हट्ट करू लागली आहेत. काही पालकांनी हे हट्ट पुरवले देखील, पण काहींसाठी ही डोकेदुखी ठरली आहे. पण आता यावर Facebook ने पर्याय शोधला असून आता १३ वर्षांच्या खालच्या मुलांसाठी देखील Instagram चं अ‍ॅप कंपनीकडून तयार केलं जात आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार कंपनीचे प्रवक्ते जो ऑसबोर्न यांनी ही माहिती दिली आहे.

पालकांना ठेवता येणार नियंत्रण!

“आपल्या मित्रमंडळींसोबत ‘अप टू डेट’ राहण्यासाठी अनेक मुलं त्यांच्या पालकांना सोशल मीडिया अ‍ॅपवर अकाऊंट उघडण्याची परवानगी मागत आहेत. सध्या पालकांकडे अशा सोशल मीडिया अ‍ॅपचे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे आम्ही आता फेसबुक मॅसेंजर किड्सप्रमाणेच इन्स्टाग्रामचं अजून एक अ‍ॅप तयार करत आहोत. हे अ‍ॅप मुलांसाठी योग्य असेल आणि पालकांना त्याचं नियंत्रण करता येऊ शकेल”, असं ऑसबोर्न म्हणाले आहेत. त्यामुळे लवकर १३ वर्षांखालच्या मुलांसाठी देखील इन्स्टाग्रामचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

सध्याच्या नियमांनुसार इन्स्टाग्राम अ‍ॅप वापरण्यासाठी १३ वर्षांची अट घालण्यात आली आहे. सध्या लहान मुलांसाठी फेसबुक मेसेंजर किड्स हे अ‍ॅप आहे. मात्र, त्यामध्ये देखील पालकांनी नकार देऊनही काही व्यक्तींशी मुलं चॅट करू शकत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावरून बराच वाद देखील ओढवला होता.

Story img Loader