ब्रिटनची कंपनी कँब्रिज अ‍ॅनालिटिकाविरोधात (Cambridge Analytica) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. 5.62 लाख भारतीय फेसबुक युजर्सचा डेटा चोरी केल्याच्या आरोपाप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात सीबीआयने युकेमधील अजून एक कंपनी ग्लोबल सायन्स रिसर्चविरोधातही कारवाई सुरू केली आहे.

भारतातील 5.62 लाख फेसबुक युजर्सची गोपनीय माहिती बेकायदेशीरपणे गोळा केल्याप्रकरणी सीबीआयने कँब्रिज अ‍ॅनालिटिकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. फेसबुक-कँब्रिज अ‍ॅनालिटिका डेटा चोरी प्रकरणाची सीबीआय चौकशी करेल अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यापूर्वीच संसदेत दिली होती.

ग्लोबल सायन्स रिसर्चने बेकायदेशीरपणे 5.62 लाख भारतीय फेसबुक युजर्सचा डेटा गोळा केला आणि हा डेटा कॅब्रिज अ‍ॅनालिटिकासोबत शेअर केला, असं उत्तर सोशल मीडिया कंपनीने CBI ला दिलं होतं. कँब्रिज अ‍ॅनालिटिकाने ग्लोबल सायन्स रिसर्चकडून अवैधपणे खासगी डेटा घेतल्याचा आणि या डेटाचा वापर भारतातील निवडणुकीवर परिणाम होण्यासाठी केल्याचा आरोप आहे.

मार्च 2018 मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय मीडिया प्लॅटफॉर्म्सनी कँब्रिज अ‍ॅनालिटिकाचे माजी कर्मचारी, सहकारी आणि कागदपत्रांच्या आधारे पाच कोटीपेक्षा जास्त युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीशिवाय फेसबुक प्रोफाइलवरुन चोरल्याचं वृत्त दिलं होतं. त्यानंतर 3 एप्रिल, 2018 रोजी कंपनीने त्यांच्याकडे भारतीयांचा कोणताही फेसबुक डेटा नसल्याचं सांगितलं होतं. तर, याउलट फेसबुकने भारत सरकारला 5 एप्रिल, 2018 रोजी सांगितलं होतं की, कँब्रिज अ‍ॅनालिटिकाने इंस्टॉल केलेल्या अ‍ॅपद्वारे जवळपास 5,62,455 भारतीयांचा फेसबुक डेटा हस्तगत केला. आता याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने चौकशी सुरू केली आहे.

Story img Loader