‘फेसबुक’ने आपल्या सर्वांचेच आयुष्य व्यापून टाकलेले आहे. अगदी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण फेसबुकचा वापर करताना दिसतात. फेसबुकने सर्वसामान्यांना मोठे समाज व्यासपीठ मिळवून दिले आहे, यात शंकाच नाही. मात्र, अनेकदा त्याचा वापर करताना पुरेशी खबरदारी न घेतल्याने एकतर वापरकर्त्यांला नुकसान सोसावे लागते किंवा त्याच्यामुळे इतरांना मनस्ताप होतो. त्यातच फेसबुकच्या वैयक्तिक सुरक्षिततेची काळजीही अनेक जण नीट घेत नाही. यामध्ये आता फेसबुक आणखी एक नवीन फिचर आणणार आहे. जे लोक विविध गोष्टींसाठी लाईक आणि शेअरींग करण्यासाठी आवाहन करतात त्यांच्यावर चाप बसविण्यासाठी फेसबुकतर्फे विशेष काम केले जाणार आहे.
अशापद्धतीच्या पोस्ट पब्लिश करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. फेसबुकने आपल्या ब्लॉगव्दारे याबाबतची माहिती दिली. आपली एखादी पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी लोक अनेक युक्त्यांचा वापर करतात आणि प्रमोशनल मेसेजेस पाठवतात. मात्र अनेक युजर्सना याचा त्रास होतो. त्यामुळे अशाप्रकारचा मेसेजना न्यूज फीडमध्ये विशेष संधी मिळणार नाही आणि ते पाठवणाऱ्यांवर चाप बसणार आहे.
अनेक फेसबुक युजर्स, कंपन्या, एखादी पोस्ट शेअर करुन, ती आपल्या मित्रांना टॅग करा, अशा प्रकारचे मेसेज करतात. यातून त्या पोस्टला जास्तीत जास्त लाईक्स किंवा कमेंट मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आता अशाप्रकारच्या पोस्टना डिमोड केलं जाईल. ज्या फेसबुक पेजवरुन अशा प्रकारच्या ट्रिक्स वापरुन वारंवार पोस्ट शेअर केली जात असेल त्यांची पोस्ट डिमोशन केली जाईल. यामुळे दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर काही प्रमाणात आळा येईल. बराच काळ याबाबतचा अभ्यास केल्यानंतर हे पाऊल उचलले असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यासाठी एक लर्निंग मॉडेलही तयार करण्यात येईल असे कंपनीने सांगितले आहे.