फेस्टिव्हल फॅशन म्हणून नावारूपाला आलेले कपडे ट्रेंडी तर आहेतच पण सणापुरते अंगावर आणि बाकीचे दिवस कपाटात असं यांच्याबाबतीत करण्याची गरज भासत नसल्याने हा इंडो-वेस्टर्न फॅशन अवतार सध्या भलताच ट्रेंडिंग आहे. साडी, सलवार-कमीज अशा वेगवेगळ्या प्रकारांत हटके प्रयोग दिसून येतात. बाकीच्या दिवशी कितीही वेस्टर्न कपडे घालणारे आपण सणावाराला मात्र पारंपरिक कपडेच घालणं पसंत करतो.

साडी

फॅशनविश्वचे चक्र पुन्हा फिरून जुन्या काळातील फॅशनकडे वळतेच. फक्त जुनी फॅशन नव्याने येताना त्यात काही तरी नवीन एलिमेंट असतो. अशा प्रकारे साडीमध्येही ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील ट्रेंड पुन्हा आला आहे. त्या काळातील सिल्कच्या साडय़ांना थोडा नवीन टच देऊ न अनेक डिझायनर्सनी वेगवेगळ्या प्रकारे साडी बाजारात आणली आहे.

सलवार कमीज

धोती पॅन्ट्सची फॅशन काही वर्षांपूर्वी बाजारात आली होती. आता तीच फॅशन थोडा हटके लुक घेऊ न पुन्हा ट्रेंडमध्ये आली आहे. या धोती पँट्सवरती तुम्ही क्रेप, पारंपरिक टॉप, कुर्ती, केप, फ्रंट आणि साइड कट कुर्ती घालू शकता.

इंडोवेस्टर्न फॅशन गाऊन्स

बाजारात पारंपरिक गाऊन्सही इंडियन गाऊन्स या नावाने उपलब्ध आहेत. आणि हे गाऊन्स छोटे ते मोठे असे कोणत्याही वयोगटाच्या पसंतीला उतरलेले आहेत. गाऊन्समध्ये कॉटन, बोल्ड, शायनी मटेरियल, नेट अशा कपडय़ांबरोबरच सिल्कचे वेगवेगळे प्रकार, खादी, कांजीवरम आणि अगदी वेल्वेटसारखा लुक देणारे कापड फॅशन कलेक्शनमध्ये आले आहेत.

प्लाझो आणि कुर्ती – टॉप

साधी ब्राइट रंगाची प्लाझो आणि त्यावर फ्रंट कट कुर्ती, स्ट्रेट कट कुर्ती, शॉर्ट कुर्ती, असमान हेमलाइन असलेली कुर्ती ट्रेंडमध्ये आहेत. अशाच प्रकारे पारंपरिक हातमागावरील कपडय़ांपासून बनवलेल्या प्लाझो पँट्स, साडीपासून बनवलेली प्लाझो यावर तुम्ही वेस्टर्न टॉप घालू शकता.

टॉप आणि स्ट्रेट पँट्स

स्ट्रेट पँट हा प्लाझोचाच छोटा प्रकार आहे. स्ट्रेट पँट्स आणि वेस्टर्न टॉपही ट्रेंडमध्ये आहेत. स्ट्रेट पँट्सवर तुम्ही पारंपरिक प्रिंट असेलेला टॉप, क्रॉप टॉप घालू शकता. या लुकवर लाँग किंवा शॉर्ट जॅकेट्स घालून हटके लुक मिळवू शकता. टॉप आणि स्ट्रेट पँट्सवर तुम्ही ओढणीही वेगवेगळ्या पद्धतीने ड्रेप करू शकता.