तेजश्री गायकवाड – response.lokprabha@expressindia.com
आभूषणे
कपडय़ांना असलेली चेन ही तशी एकदम साधी गोष्ट. पण एके काळी कपडय़ांच्या फिटिंगपुरत्या असलेल्या चेन आता कपडय़ांच्या फॅशनच्या बाबतीत महत्त्वाची अॅक्सेसरी आहेत.
झिप्स किंवा चेन्स हा कपडय़ांच्या फिटिंगसाठी वापरला जाणारा महत्त्वाचा फिनिशिंग फास्टनर. पण आता झिप्स डेकोरेटिव्ह फास्टनर म्हणूनही ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. असंख्य रंगामध्ये, डिझाइनमध्ये उपलब्ध असलेल्या झिप्स अनेक कपडय़ांच्या फिटिंगचंही काम करते आणि डेकोरेशनचंही. या झिप्सचा कल्पक वापर अनेक नावाजलेले फॅशन डिझायनर करत आहेत.
१८५१ मध्ये एलिआस होवे याने कपडे जोडले जातील आणि योग्य फिटिंग देतील अशा गोष्टीचा म्हणजेच झिपचा शोध लावला. पण त्याने ते बाजारात आणण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे झिपर्स बाजरात यायला वेळ लागला. ४० वर्षांनंतर, म्हणजे १८९३ मध्ये व्हाटकोंब जुडसनने ‘क्लेप लॉकर’ बाजारात आणले. क्लेप लॉकर म्हणजे मेटलचं हुक आणि डोळा अशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर कर्नल लेविस वॉकरच्या सोबत जुडसनने नवीन डिव्हाइस तयार करण्यासाठी युनिव्हर्सल फास्टनर कंपनी सुरू केली. क्लेप लॉकर १८९३ मध्ये शिकागोच्या वर्ल्ड फेअरमध्ये सगळ्यांसमोर आलं आणि इथून झिपर्सला खरी ओळख मिळाली. जुडसनला झिपरचा जनकअसं श्रेय दिलं जातं. युनिव्हर्सल फास्टनर कंपनी १९०१ मध्ये होबोकन, न्यू जर्सी येथे स्थलांतरित झाली. १९०६ मध्ये स्वीडिश-अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता गिडोन सुन्डबॅक यांना कंपनीसाठी कामावर घेण्यात आले होते. सनबॅकने झिपर्समध्ये चांगले बदल केले आणि १९०९ मध्ये त्याने जर्मनीत पेटंटची नोंदणी केली.
मेटल झिपर :
मेटल झिपर हा झिपरचा जुना प्रकार आहे. पितळ, निकेल, अॅल्युमिनियम आणि मॅग्नेशीयम अशा धातूंपासून मेटल झिपर बनवले जायचे. आताही हेच धातू ट्रेण्डमध्ये आहेत. अशा मूळ धातू रंगांच्या व्यतिरिक्त आता अनेक रंगांमध्ये मेटल झिपर बाजारात उपलब्ध आहेत. लाइट कॉपर आणि िलबू गोल्ड फिनिश असे नवीन रंगही बाजारात आले आहेत. जाड लेदर जॅकेट्स आणि बॅग्स अशा जाड फॅब्रिक्सवर या मेटल झिप्स लावल्या जातात. साध्याशा कपडय़ांवर हे झिपर लावले तरी त्या कपडय़ाचा लुक बदलतो. या झिपर्स अनेकदा आपण जीन्सवरती बघतो पण आता त्या सगळ्याच प्रकारच्या कपडय़ांना झिपर असतात.
अदृश्य झिपर :
नावाप्रमाणेच या बाहेरच्या बाजूला दिसत नाहीत. तरीही या सर्वात सुंदर झिपर्सपकी आहेत. कारण त्यांच्यामुळे येणार फिटिंग. हे झिपर लावलेले कपडे नेहमीच स्वच्छ आणि सुबक दिसतात. या झिपर्सची निवड करताना मात्र विरोधी रंगाची निवड चुकूनही करू नका. सारख्या रंगांचीच झिपर्स कपडय़ांवर शोभून दिसतात. स्कर्ट, वनपीस, गाऊन अशा कपडय़ांमध्ये जास्तीत जास्त या झिपर्सचा वापर करतात.
प्लास्टिक झिपर :
या झिपर्ससुद्धा अनेक कपडय़ांमध्ये वापरल्या जातात. लाल, पिवळा, काळ, निळा अशा रंगांपासून ते अगदी आत्ताच्या फंकी निऑन, न्यूड अशा रंगांमध्येही त्या बाजारात उपलब्ध आहेत. यांच्या लटकनमध्ये फार वैविध्य दिसत नाही. या झिपर्स वेगवेगळ्या आकारामध्येही येतात. झिपचे लटकन म्हणजे ज्याला पकडून आपण झिपची उघडझाप करू शकतो.
ओपन एण्डेड झिपर :
या प्रकारच्या झिपर्स जॅकेट्समध्ये तुम्ही नक्की बघितल्या असणार. या झिपर्सचे दोन भाग होतात. याचं लटकन झिपर्सच्या एकाच बाजूला फिक्स केलेलं असतं. दुसऱ्या बाजूला तुम्हाला ते लावायचं असतं. आता या झिपर्स फक्त जॅकेट्सपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत याचा वापर अनेक फॅशन डिझायनर वेगवेगळ्या कपडय़ांसाठीही करताना दिसत आहेत. झिप्सचा कल्पक वापर अनेक फॅशन डिझायनर सोपे पॅटर्न तयार करण्यासाठीही करत आहेत. म्हणजेच एखाद्या शॉर्ट स्कर्टची झिप उघडली तर त्याचा लाँग स्कर्ट तयार होऊ शकतो. कपडे शिवून घेताना सहसा कपडय़ानुसार मॅचिंग झिप शोधली जाते. पण जरा विरुद्ध रंगाची, प्लास्टिक ऐवजी चंदेरी किंवा सोनेरी मेटलची झिप लावून बघा. नक्कीच वेगळा लूक मिळेल. या झिपच्या लटकनमध्येही व्हरायटी आहेत.
सौजन्य – लोकप्रभा