मेंदूतील हिप्पोकॅम्पस भागाचे आकुंचनफास्ट फूड हा अन्नपदार्थात खलनायक असलेला घटक आहे. दुर्दैवाने आजची तरुण पिढी पोषणासाठी त्यावरच अवलंबून आहे हे दुर्दैव. फास्ट फूडचा परिणाम केवळ पोटावरच नाही तर मेंदूवरही होत असल्याचे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. फास्ट फूडमुळे तुमची अध्ययन क्षमता, स्मृती व मेंदूचे आरोग्य यावर वाईट परिणाम होत असतो, असे हा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितले.
मधुर थंड पेये, मीठ असलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले मांस यामुळे प्रौढांमध्ये हिप्पोकॅम्पस या मेंदूच्या डाव्या भागाचे आकुंचन झालेले दिसते. त्या तुलनेत आरोग्यदायी आहार घेणाऱ्या लोकांमध्ये मेंदूचा हा भाग तुलनेने मोठा असतो. मेंदूतील हा भाग अध्ययन, स्मृती, मानसिक आरोग्य यांच्याशी संबंधित असतो. ऑस्ट्रेलियातील डियाकिन विद्यापीठातील प्राध्यापक फेलाइस जॅका यांच्या मते अनारोग्यकारक आहारामुळे अनेक लोकांमध्ये कमरेचा घेर वाढतो, त्याचबरोबर मेंदूचे आरोग्यही बिघडते. अन्नातील घटकांचा परिणाम मेंदूवर होत असतो हे माहिती होते, पण नेमका काय परिणाम होतो हे माहिती नव्हते ते या संशोधनात स्पष्ट झाले आहे.
हिप्पोकॅम्पसचा आकार त्यामुळे कमी होतो, आधीचे संशोधन उंदरांवर करण्यात आलेले होते आता ते माणसातही खरे ठरले आहे. संशोधकांनी ६० ते ६४ वयोगटातील माणसांमध्ये मेंदूतील हिप्पोकॅम्पी भागाचा आकार चुंबकीय सस्पंदन पद्धतीने मोडला. त्यांचा आहार काय होता त्यातील घटक काय होते याचाही अभ्यास केला. त्या आधारे जे लोक फास्ट फूड खातात त्यांच्या हिप्पोकॅम्पसचा आकार कमी होतो, असे दिसून आले. भाज्या, फळे, मासे जे लोक खातात त्याच्या मेंदूतील हा डाव्या बाजूचा भाग आकुंचन पावत नाही तर तो योग्य आकारात असतो.
स्मृतिभ्रंश व मेंदूच्या आरोग्याशी त्याचा संबंध असतो. मेंदूच्या आजारांमुळे जगभरात अनेक लोकांमध्ये कार्यक्षमता कमी झालेली असते, वयपरत्वे विसरभोळेपणाही त्यामुळे लवकर वाढत जातो. नैराश्याचा आजारही त्यामुळे जडतो. हिप्पोकॅम्पस हा भाग आकलन, स्मृती व मानसिक आरोग्याशी निगडित असतो. मुले, प्रौढ व्यक्ती, व वृद्ध यांच्यात आहारातून चांगले पोषण मिळणे आवश्यक असते अन्यथा त्याचा मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो. बीएमसी मेडिसिन नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Sep 2015 रोजी प्रकाशित
‘फास्ट फूड’ मेंदूसाठी धोकादायक
फास्ट फूड हा अन्नपदार्थात खलनायक असलेला घटक आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
Updated:

First published on: 21-09-2015 at 01:28 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fast food dangerous for the brain