लॅक्मे फॅशनवीकसाठी प्रथमच स्थूल बांध्याच्या मॉडेल्सचा शोध

सुडौल बांधा असलेली, उंच, शिडशिडीत किंवा ‘साइज झिरो’ असलेली मॉडेल कुठल्याही फॅशन शोच्या रॅम्प वॉकसाठी आदर्श समजली जाते. मॉडेिलगसाठी आवश्यक असणाऱ्या सौंदर्याच्या परिभाषेत लठ्ठपणाला जागा नाही, असे मानले जाते. परंतु यावर्षी प्रथमच लॅक्मे फॅशन वीकमध्ये ‘प्लस साइज’ कपडय़ांचा फॅशन शो होणार असून त्यात स्थूल बांध्याच्या मॉडेल रॅम्पवरून दिमाखात चालणार आहेत. यासाठी प्रथमच प्लस साइझ मॉडेल्सच्या ऑडिशनही येत्या शुक्रवारी मुंबईत होत आहेत. येत्या २४ ते २८ ऑगस्टदरम्यान ‘लॅक्मे फॅशन वीक िवटर फेस्टीव्ह’, २०१६ मुंबईत होणार आहे. त्यामध्ये लठ्ठ स्त्री-पुरुषांसाठीच्या कलेक्शनचा हा शो होईल.

फॅशन शो आणि रॅम्प म्हणजे शिडशिडीत बांध्याच्या मॉडेलचे क्षेत्र असा समज अलिकडच्या काळात पुसला जात आहे. यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक – समर’ शो मध्ये तर वय, बांधा, लिंग अशी कोणतीही मर्यादा न ठेवता एक फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. तृतीयपंथीयांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यां लक्ष्मी त्रिपाठी, आणि विनोदी कलाकार भारती सिंग या शोच्या प्रमुख आकर्षण होत्या. हाच ट्रेंड आता आणखी पुढे नेत सर्वसामान्यांतील ‘प्लस साइज’ अर्थात स्थूल बांध्यांच्या तरुण तरुणींची मॉडेल म्हणून निवड करण्यात येत आहे. ‘ऑल- द प्लस साइझ स्टोअर’ या ब्रॅण्डचे कपडे या प्लस साइझ शोमधून प्रदíशत करण्यात येणार आहेत. प्रसिद्ध डिझायनर लिटिल शिल्पा अर्थात शिल्पा चव्हाण या शोसाठी स्त्री-पुरुष मॉडेल्सचं स्टायिलग करणार आहे.

डिझायनर कपडे मर्यादित मापांमध्येच उपलब्ध असतात. प्लस साइझमध्ये उपलब्धता खूप कमी असते. ही बाब लक्षात घेऊन यंदा या शोचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय फॅशनची व्याख्या यामुळे बदलू शकेल, असे लॅक्मेच्या वतीने पूर्णिमा लांबा यांनी सांगितले. डिझायनर शिल्पा चव्हाण म्हणाल्या की, ‘फॅशन हि कोणत्याही एका साइझपुरती मर्यादित नसून ती एक जागतिक चळवळ आहे आणि त्यामुळे ती कोणत्याही मापात बसू शकते. त्यात अनेक प्रयोग सुद्धा करता येतात. समाजमाध्यमांवर हल्ली तुम्ही आहात तशाच सुंदर आहात, असा आत्मविश्वास देणाऱ्या आणि सौंदर्याची नवी परिभाषा उलगडणाऱ्या विषयांवर पुष्कळ भाष्य केलं जातं. त्याचाच हा पुढचा भाग आहे, असं मी मानते आणि या शोसाठी मी स्वत खूप उत्सुक आहे.’

प्लस साइज म्हणजे?

कपडय़ांचे माप हे कंबरेच्या मापाच्या तुलनेत मोजले जाते. साधारणपणे ‘प्लस साइज’ म्हणजे स्त्रियांकरिता ३४ इंचहून अधिकचे कंबरेचे माप. तर पुरूषांकरिता ते ४० इंचहून अधिक असते.

Story img Loader