महाराष्ट्रात जेवणानंतर आठवणीने दिला जाणारा पदार्थ म्हणजे बडिशेप. आता ही प्रथा काहीशी कमी झाली असली तरी आजही सणा-वाराला गोडाधोडाचे जेवण केल्यानंतर मात्र आपण बडिशेप खातोच. बडिशेप खाल्ल्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते इतकेच आपल्याला माहित असते. मात्र बडिशेप खाण्याचे आणखीही अनेक फायदे आहेत.

– केवळ जेवणानंतर खाण्यासाठीच नाही तर दैनंदिन आहारातही आपण बडिशेपचा अतिशय चांगल्या पद्धतीने समावेश करु शकतो. तोंडाला येणारा दुर्गंध कमी होण्यासाठी बडिशेप उपयुक्त ठरते, याशिवाय पोटफुगीचा त्रास असणाऱ्यांनी बडिशेप खाल्ल्यास हा त्रास कमी होण्यास मदत होते.

– मासिकपाळीच्या दिवसात पोटात जास्त दुखत असेल तर महिलांनी साखरेसोबत बडिशेप खावी. पोटदुखी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

– बडीशेप नियमित खालली तर दृष्टी चांगली होते. रोज जेवून झाल्यानंतर एक चमचा बडीशेप खा. याशिवाय अर्धा चमचा बडीशेपची पूड, एक चमचा खडीसाखरसोबत दूधात घालून प्या. यामुळे दृष्टी सुधारेल.

– सकाळी रिकाम्या पोटी बडिशेपचं पाणी प्यायल्याने मेंदू थंड राहतो आणि शरीरातील रक्तही स्वच्छ होते.

– वजन घटवण्यास आणि अ‍ॅनिमियाचा धोका कमी करण्यासही बडिशेपची मदत होते.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये.)