रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबू मिसळून पिणे हे आपल्या आरोग्यासाठी फारच उपयुक्त ठरू शकते. हे पेय केवळ शरीरासाठी फायदेशीर नसून त्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी आणि आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठीदेखील होतो. हिवाळ्याचा, थंडीचा त्रास होऊन आपल्याला सतत काही न काही छोटे-मोठे आजार होतच असतात. त्यामुळे अशा वातावरणाचा सामना करण्यासाठी अंश पोटी/ रिकाम्या पोटी जर सकाळी तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात थोडं लिंबू आणि एक छोटा चमचा मध मिसळून प्यायला, तर त्याचा फायदा तुमच्या शरीराला होण्यास मदत होऊ शकते.
कोमट लिंबू-मध पाण्याचे शरीराला कोणकोणते फायदे होतात पाहू :
१. पचनासाठी फायदेशीर
या पेयाचा सर्वात उत्तम फायदा हा आपल्या पचनव्यवस्थेवर होत असतो. या पेयात असणाऱ्या ॲसिडमुळे आपल्या पोटातील अन्न भरभर पचण्यास मदत होते, ज्यामुळे पोट निरोगी राहते. परिणामी पचनशक्ती वाढून, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. जेवणाच्या थोडावेळ आधी लिंबू पाणी पिण्याने, अन्नपदार्थांच्या पचनास मदत होते.
२. शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते.
मध आणि लिंबू कोमट पाण्यातून पिण्याने आपले शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. जर तुम्ही दिवसभरातून गरजेपेक्षा कमी पाणी पित असाल, तर ही कोमट मध लिंबू पाणी पिण्याची सवय स्वतःला लावून घेतल्याने शरीराला फायदा होऊ शकतो. या सवयीने तुमच्या शरीराला क जीवनसत्व [व्हिटॅमिन सी] व इतर आवश्यक पोषक घटक मिळून तुमचे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होऊ शकते.
हेही वाचा : थंडीच्या दिवसांत गाजर ठेवेल वजनावर नियंत्रण! पाहा काय आहेत तज्ज्ञांनी सांगितलेले गाजराचे फायदे आणि गुणधर्म….
३. पेशींचे संरक्षण होते
अमेरिकेतील ओहायोमधील क्लिव्हलँड क्लिनिकनुसार, प्रत्येक उत्पादनांप्रमाणे लिंबामध्येदेखील फायटोन्यूट्रिएंट्स [phytonutrients] असतात, जे तुमच्या शरीराचे रोगापासून रक्षण करण्यास मदत करतात. या फायटोन्यूट्रिएंट्समध्ये प्रचंड शक्तिशाली असे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे तुमच्या पेशींचे ऑक्सिडेशन होण्यापासून बचाव करतात. या कारणामुळेदेखील लिंबू पाणी पिण्याचा शरीराला खूप मोठा फायदा होऊ शकतो.
४. वजन कमी करण्यास मदत होते
दररोज कोमट मध, लिंबू पाणी पिण्याने तुमच्या शरीराची पचनव्यवस्था सुरळीत होते, ज्यामुळे वजन नियंत्रित राहते. लिंबू, मध पाणी हे एक प्रकारचे डिटॉक्स पेय असून, यामध्ये कॅलरीजचे प्रमाणदेखील कमी असते. हे पेय प्यायल्याने तुमचे पोट भरलेले राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनशक्ती सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
५. किडनी स्टोनसाठी उपयुक्त
दररोज लिंबू पाणी पिण्याने, मुत्राशयाला किडनी स्टोनच्या समस्येपासून वाचवले जाऊ शकते. जे मुळातच पाणी कमी पितात, त्यांना मूत्राशयात स्टोन्स होण्याची शक्यता असते. अश्यांमध्ये लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहून, किडनी स्टोन्सचा धोका कमी होऊ शकतो. असे क्लिव्हलँड क्लिनिकने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार समजते.
[टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून, यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]