Dry fruits for Weight Loss: बैठ्या जीवनशैलीमुळे अलीकडे आबालवृद्धांपर्यंत प्रत्येक गटात लठ्ठपणा हा कॉमन त्रास ठरत आहे. लठ्ठपणाला जोडून अनेक शारीरिक त्रास तर येतातच पण याचा गंभीर परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवर होऊ शकतो. अतिवजन असलेल्या अनेकांमध्ये न्युनगंड पाहायला मिळतो ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतोच शिवाय विचारांचे स्वरूपही नकारात्मक होऊ लागते. अशावेळी तुम्हाला वजन कमी करण्याचे प्रयत्न करत असतानाही केवळ धैर्य व मानसिक तयारी नसल्याने अपयश येऊ शकते. वजन कमी करण्यासाठी महाग गोळ्या, औषधे, इंजेक्शन, सर्जरीज किंवा अगदी मन मारून जगायला लावणारे डाएट करण्याची काहीच गरज नाही. उलट तुम्ही हसत खेळत सुद्धा स्वतःला फिट आणि फाईन बनवू शकता. अशा हेल्दी वेट लॉसला प्रोत्साहन देणारे आहारतज्ज्ञ अनेकदा वजन कमी करण्यासाठीच्या डाएटमध्ये सुक्यामेव्याला विशेष स्थान देतात.
सुका मेवा म्हणजेच ड्राय फ्रुट्स हे कमी प्रमाणात खाऊनही शरीराची भूक व पोषक सत्वांची गरज भागविण्याचे काम करतात. शिवाय यातील फायबरमुळे पचनक्रिया सुद्धा वेगवान होते याचा एकत्रित परिणाम आपल्या वजनावर होऊ शकतो. आज आपण पाच असे ड्रायफ्रुट्स पाहणार आहोत जे वजन कमी करण्यात आपली मदत करू शकतात.
वजन कमी करायचंय तर ‘हे’ पाच ड्रायफ्रूट्स खा
१) अक्रोड: आहारतज्ज्ञ तर मानवी मेंदूप्रमाणे दिसणाऱ्या या अक्रोडाला सुपरफूड म्हणून संबोधतात. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसह आवश्यक पोषक तत्वांचा खजिना असतो, ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित करताना तुम्ही तुमच्या शरीराचे पोषण मात्र कमी करत नाही याची खात्री होते. अक्रोडमधील फायबरमुळे चयापचय क्रिया सुद्धा वेगाने होण्यास मदत होते.
२) बदाम: मॅग्नेशियम, सेलेनियम आणि झिंक बदामामध्ये आढळतात. पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनास मदत होते. यामध्ये आढळणारे फायटिक अॅसिड्स सहज पचतात. शिवाय पोट भरल्याची भावना निर्माण करतात यामुळे वारंवार अनावश्यक खात राहण्याचे प्रमाण कमी होते.
३) पिस्ता: चटपटीत पिस्ता हा गोड खाणे आवडत नसलेल्यांसाठी बेस्ट पर्याय आहे. शिवाय जर आपल्याला डायबिटीज किंवा थायरॉईडसारखे त्रास असतील तरीही पिस्ता खाता येऊ शकतो. पिस्त्यामध्ये कॅलरी अगदी कमी व प्रोटीनचे प्रमाण मुबलक असते म्हणूनच हा शरीराला वजन कमी करताना प्रोटीनची कमतरता भासू देत नाही.
४) काळे मनुके: काळे मनुके हा वजन कमी करण्याचा वर्षानुवर्षे वापरला गेलेला फंडा आहे. सकाळी उठल्यावर चार ते पाच काळे मनुक पाण्यात भिऊन खाल्ल्यास याचे कमाल फायदे मिळू शकतात. यामुळे पचनाचा वेग तर वाढतोच पण तुम्हाला बद्धकोष्ठचा त्रास असेल तर त्यावरही चटकन उत्तर मिळते.
५) काजू: काजूमधील मॅग्नेशियम, फॅट्स आणि कार्ब्स मेटॅबलॉलिज्म सुधारण्याचे काम करतात ज्याचा फायदा तुम्हाला वजन कमी करण्यास होऊ शकतो. काजू हे प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत काजूमध्ये कॅलरी जास्त असल्यामुळे, दररोज योग्य प्रमाणात खाल्ल्यासच यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
हे ही वाचा<< १० रुपयात चेहऱ्यावरचे केस घरच्या घरी कसे काढाल? रेझर, किंवा वॅक्सची गरजच नाही, असा वाचवा त्रास
अलीकडे अनेकजण इंटरमिटंट फास्टिंग करत असल्यामुळे सकाळी उठून ब्रेकफास्ट स्किप केला जातो, पण आशाएं शरीरातील ऍसिडचे प्रमाण वाढू शकते त्याऐवजी आपण मोजके ड्रायफ्रुट्स खाल्ल्यास आपल्या पोटाला आधार मिळू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)