5 Natural Remedies To Get Rid Of Lizards At Home : घरात कितीही साफसफाई ठेवली तरी पालींचा उपद्रव काही केल्या कमी होत नाही. विशेषत: उन्हाळ्यात घरातील भिंतींवर मोठ्या प्रमाणात पाली फिरताना दिसतात. त्या कधी घरातील बाथरूम तर कधी किचनमध्ये आपलं घर तयार करतात. पाल फक्त दिसायलाच वाईट दिसत नाही, तर ती अन्नपदार्थांमध्ये पडल्यास ते अन्न विष बनते.

कारण- पालीची लाळ आणि विष्ठा यांत साल्मोनेला नावाचा जीवाणू असतो, जो अन्नपदार्थाला दूषित करतो. मग स्वाभाविकत: अशा पदार्थाचे सेवन केल्यास अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. पण, अनेकविध प्रयत्न करूनही घरातील पालींचा नायनाट करणे मात्र शक्य होत नाही. पण, आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत की, ज्यांच्या मदतीने तुम्ही घरातून पालींना काही सेकंदांत बाहेर पळवू शकता.

घरातून पालींना पळवून लावण्याचे सोपे घरगुती उपाय

घरातून पाली पळवून लावण्याआधी त्या घरात नेमक्या का शिरतात ते जाणून घेऊ. पाली सहसा किटकांसारख्या अन्नाच्या शोधात घरात शिरतात आणि आपला निवारा तयार करतात. त्यात काहीच न मिळाल्यास स्वयंपाकघरात ठेवलेले उरलेले उघडे अन्न त्यांना सहज सापडते. त्याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांत घरातील तापमान थंड असते. म्हणून ओलसरपणा आणि थंडाव्याच्या शोधात त्या घरात येतात. त्यानंतर छतावरील भेगा आणि खिडक्यांमधील रिकाम्या जागांमध्ये राहण्यासाठी जागा करतात. पण, या पालींना पळवून लावण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करून पाहू शकता.

१) मिरी आणि लाल तिखट पावडर

उन्हाळ्यात घरातून पालींना पळवण्यासाठी तुम्ही काळी मिरी आणि लाल तिखट पावडरचा स्प्रे बनवू शकता. हे तयार करण्यासाठी एका स्प्रे बाटलीत पाणी भरा. आता काळी मिरी आणि लाल तिखट पावडर एकत्र मिक्स करा. त्यानंतर तयार स्प्रे भिंतींवर फिरणाऱ्या पालीवर मारा. अशा कृतीने पाली काही मिनिटांत पळून जातील.

२) कांदे

कांद्यांच्या मदतीनेही तुम्ही पालींना पळवून लावू शकता. त्यासाठी प्रथम कांदे दोरीने बांधा आणि ज्या ठिकाणी पाली जास्त येतात, त्या ठिकाणी भिंतीवर लटकवा. असे केल्याने पाली पळून जातील. कांद्यामध्ये सल्फर असल्याने, त्यातून खूप तीव्र वास येतो. या वासामुळे पाल पळून जाण्यास मदत होते.

३) कांदा आणि लसूण

घरातून पालींना हाकलण्यासाठी तुम्ही कांदा आणि लसणाचा स्प्रे तयार करू शकता. हा स्प्रे तयार करण्यासाठी प्रथम कांदा आणि लसणाचा बारीक रस काढून घ्या. आता त्यात थोडे पाणी मिक्स करा आणि स्प्रे करून घ्या. हा स्प्रे व्यवस्थित हलवा आणि पाल दिसताच तिथे स्प्रे करा. अशाने पाली घरातून काही मिनिटांतच पळून जातील.

४) अंड्याचे कवच

अंड्याच्या कवचांमधून येणारा वासही पालीला पळवून लावण्यासाठी प्रभावी उपाय आहे. अंड्याचे कवच पाली ज्या ठिकाणी दिसतात, तिथे अडकून ठेवा. विशेषतः किचन टॉप आणि कॅबिनेटमध्ये तुम्ही अंड्याचे हे कवच ठेवू शकता. त्यामुळे किचनमधून तरी पालींना दूर करता येईल.

५) कॉफी आणि तंबाखू

कॉफी पावडर आणि तंबाखूच्या मदतीनेही तुम्ही पालींना दूर ठेवू शकता. त्यासाठी तंबाखू आणि कॉफी पावडर एकत्र करून घ्या, या मिश्रणाचे पाण्याच्या मदतीने छोटे छोटे गोळे बनवून घ्या. हे गोळे पाली ज्या ठिकाणी फिरताना दिसतात, तिथे ठेवा. पालीने हा गोळा खाल्ल्यावर ती तिथून पळून जाईल.