निसर्गाने विविध फळांमध्ये विविध प्रकारच्या उपयुक्त अन्नद्रव्यांचे भांडारच भरलेले आहे. भरपूर आणि नियमितपणे फळांचे सेवन केल्यास केवळ आरोग्यच नव्हे, तर सौंदर्यवर्धन होण्यास उपयोगच होतो. सामान्यपणे असा सल्ला सर्वच डॉक्टर त्यांच्या पेशंटला देतात. मग आपण का फळे खाण्यात कंजुसी करायची. दररोज सर्वच प्रकारची फळे खाणे शक्य नाही. ऋतू प्रमाणेच ती सहज उपलब्ध होतात. त्यामुळे आपला देखील तसा आग्रह नसावा. सतत वेगवेगळी फळे खाल्ल्याचा फायदा जास्तच, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सध्या बाजारामध्ये डाळींब हे सर्वांच्या आवडीचे फळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. याला इंग्रजीमध्ये पॉमिग्रेनेट असे म्हणतात. या डाळींबाची आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टीने उपयोगीता काय ते पाहूयात.
१. तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे
डाळींबामध्ये अनेक औषधी गुण आहेत. डाळींबाचा रस पित्तक्षामक आहे. या फळाचे सेवन केल्यास अपचन दूर होते. कावीळ झालेल्या व्यक्तींसाठी हे एक चांगले औषध आहे. डाळींबाचा रस, मध, साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरा करतो. आवाज बसला असल्यास तो सुधारण्यास डाळींब मदत करते. डाळींबाच्या रसरशीत बियांमध्ये अँटी ऑक्सिडंटस आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होणाऱ्यांसाठी ते एक चांगले औषध आहे. डाळींबाच्या आतील पांढऱ्या रंगाच्या बिया डायरीया, तोंडाचा आणि घशाच्या अल्सरवर चांगला उपाय आहेत.
२. तुमच्या हृदयाचा मित्र
हृदयाच्या आरोग्यासाठी डाळींबाचा रस अतिशय उपयुक्त आहे. हृदयविकारापासून दिलासा देण्याचे काम डाळींब करत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. हृदयातील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्याचे काम डाळिंबामधील औषधी गुण पार पाडतात. कॉलेस्ट्रॉलवर डाळींब नियंत्रण ठेवत असल्याच्या नोंदी संशोधकांनी केल्या आहेत.
३. कर्करोग आणि मधुमेहापासून संरक्षण
डाळिंबामधील औषधी गुण कर्करोग आणि मधुमेहासारख्या दुर्धर रोगांपासून दूर राहण्यासाठी उपकारक आहेत.
४. त्वचा तजेलदार ठेवते
चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी डाळिंबाचा रस गुणकारक आहे. अनेक सौदर्यप्रसाधनांमध्ये डाळिंबाच्या रसाचा वापर करतात. संतुलित आहारासोबत नियमित डाळींब खाणाऱ्यांची त्वचा नेहमी तजेलदार राहण्यास मदत होते.
तर मग हे औषधी चविष्ट आणि रसदार फळ खाण्यात हरकत ती कोणती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा