इतर कोणत्याही हवामानापेक्षा हिवाळ्यामध्ये आपले शरीर अधिक सुस्तावलेले असते. त्यामुळे फार व्यायाम किंवा हालचाल होत नाही. त्यासोबतच तेलकट, चटपटीत पदार्थांचे सेवनसुद्धा अधिक प्रमाणात केले जाते. त्यामुळे अशा लहान लहान सवयीचा वाईट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. पाणी कमी पिणे, फायबरयुक्त पदार्थांचे सेवन न करणे, अरबट-चरबट पदार्थ खाणे आणि असे असतानाही कोणत्याही प्रकारची हालचाल न करता, सुस्त पडून राहण्याचा चुकीचा परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर होतो. परिणामी पोट साफ न होणे आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उदभवतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हिवाळ्यातील थंड हवेमुळे आपल्या दैनंदिन सवयींमध्ये बदल होत असतो. शरीरात ऊब आणि ऊर्जा निर्माण होण्यासाठी सतत गरम पेयांचे सेवन केले जात असते. परंतु, अशा वातावरणात काही सवयींमुळे आपल्या पोटामध्ये बिघाड होऊन, पचनाच्या समस्या निर्माण होतात. परिणामी पोट साफ होत नाही किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो,” असे ‘प्रीस्टन केअर’मधील वरिष्ठ प्रोक्टोलॉजी सर्जन डॉक्टर अमोल गोसावी [Dr. Amol Gosavi, Senior Surgeon, Proctology, Pristyn Care] यांनी हिंदुस्थान टाइम्स डिजिटलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले.

हिवाळ्यातील या पाच सवयींमुळे होऊ शकते बद्धकोष्ठता

१. कमी पाणी पिणे

हिवाळ्यात फार तहान लागत नसल्याने आपोआप पाणी पिण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. परिणामी शरीर डिहायड्रेट होते. इतर दिवसांप्रमाणे थंडीच्या दिवसांतही पाणी पिण्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. असे न केल्यास पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊन, मलविसर्जनास त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी सतत पाणी पित राहावे. तहान लागली नसली तरीही थोड्या थोड्या अंतराने एक-दोन घोट पाणी प्यावे.

हेही वाचा : हिवाळ्यात आंघोळ करताना ‘या’ पाच गोष्टींकडे लक्ष द्या; पाहा त्वचा मुलायम अन् तुकतुकीत ठेवण्यासाठी या टिप्स….

२. आहारातील फायबरचे प्रमाण

थंड हवेत अनावश्यक पदार्थ आणि आरोग्यासाठी उपयुक्त नसलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते. आहारातील फायबरचे प्रमाण कमी झाल्याने पचनव्यवस्थेच्या कामात अडथळा निर्माण होतो. परिणामी पोट साफ होत नाही. असे होऊ नये यासाठी सकस आहार घेणे गरजेचे असते. त्यामुळे आहारात फायबरयुक्त फळे, भाज्या आणि धान्यांचा वापर करावा.

३. शारीरिक हालचाल

हवेतील गारव्यामुळे बरेच जण घरी राहणे पसंत करतात. अशा वेळेस व्यायामाची सवय नसेल आणि बैठे काम असेल, तर शरीराची फारशी काही हालचाल होत नाही. आपल्या पचनसंस्थेसाठी जशी पाणी आणि फायबरयुक्त आहाराची आवश्यकता असते, तशाच शारीरिक हालचालीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळे काही मिनिटांसाठी तरी हलका व्यायाम, योगा यांसारख्या गोष्टी करा.

४. कॅफिनचे प्रमाण

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला ऊब देणारी चहा, कॉफी यांसारखी गरम पेये आपण हमखास पित असतो. परंतु, या पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. या पदार्थांमध्ये असणाऱ्या कॅफिन आणि इतर काही घटकांमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. परिणामी बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण दिवसभरात किती कप चहा आणि कॉफी यांसारखे पदार्थ तुम्ही पीत आहात यावर लक्ष ठेवा.

हेही वाचा : सकाळच्या ‘या’ सवयी ठेवतील तुम्हाला तंदुरुस्त; हिवाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यायची पाहा…..

५. प्रकिया केलेल्या पदार्थांचे सेवन (Processed Food)

शक्य तितक्या रिफाईंड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळा. या पदार्थांच्या सेवनानेदेखील पोट साफ न होण्याची तक्रार निर्माण होऊ शकते. फायबरयुक्त पदार्थ खाणे, योग्य प्रमाणात पाणी पिणे, व्यायाम आणि वेळोवेळी बाथरूमला जाऊन येणे, यांसारख्या लहान लहान सवयी जर तुम्ही वेळीच लावून घेतल्यात, तर तुम्हाला बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही आणि हा हिवाळा तुमच्या शरीर आणि पोटासाठी आरोग्यदायी ठरू शकतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five unhealthy winter habits can cause problems like constipation try doing these things everyday dha