ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने मुंबईत आपलं पहिलं ऑनलाइन सुपरमार्ट सुरू केलं आहे. नवी दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांमध्ये ही सेवा फ्लिपकार्टने यापूर्वीच सुरू केली आहे. मुंबईतील ९१ ठिकाणांना (पिनकोड्स) ही सेवा पुरवण्यात येणार आहे. याद्वारे मुंबईतील ग्राहकांना घरबसल्या किराणा सामानाची ऑर्डर करता येणार आहे. फ्लिपकार्टचे अँड्रॉइड व आयओएस मोबाइल अॅप, तसेच डेस्‍कटॉप व मोबाइल वेबसाइट्सच्‍या माध्‍यमातून ही खरेदी करता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सुपरमार्टवर ६०० रूपयांपेक्षा अधिक रकमेची खरेदी केल्यास मोफत घरपोच डिलिव्हरी केली जाणार आहे. याशिवाय सुपरमार्टने निवडक व विशिष्ट ग्राहकांसाठी बाय नाऊ, पे लॅटर ही सुविधा दिली आहे. यानुसार या ग्राहकांना पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत आधल्या महिन्याच्या खरेदीचे बिल देण्याची मुभा मिळेल. किराणा मालाचे बिल पुढील महिन्यात देण्याची भारतातील प्रथा लक्षात घेऊन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने ही मुभा दिली आहे. या सुपरमार्टमधून ग्राहकांना रोजच्‍या गरजेच्‍या वस्‍तू व दुग्‍ध उत्‍पादने मिळतील. या माध्यमातून ग्राहकांना उच्‍च दर्जाची किराणा उत्‍पादने किफायतशीर दरात मिळतील तसेच, आकर्षक ऑफर, घरपोच सेवा आदी सुविधा मिळतील, असे फ्लिपकार्टने म्हटले आहे. तसंच, जर खरेदी केलेलं सामान अयोग्य वाटल्यास ते परत करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल.

मुंबईतील ज्या ९१ ठिकाणी ही सेवा सुरू होणार आहे यामध्ये पश्चिम व मध्‍य उपनगरे आणि नवी मुंबईपर्यंतच्या भागांचा समावेश आहे. म्‍हणजेच, शहरातील ७५ टक्‍के भाग यात सामावला जाणार आहे. नवीन कल्पना व ऑफरसह ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यास आम्ही उत्‍सुक आहोत, गेल्‍या वर्षामध्‍ये आमचा किराणा व्‍यवसाय लक्षणीय प्रमाणात वाढलाय. म्‍हणूनच मुंबईकरांना ऑनलाइन किराणासेवा देण्याची ही योग्य वेळ आहे. यातून रोजगारनिर्मितीमध्ये भर होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास या ई-कॉमर्स कंपनीने व्यक्त केला आहे.

भारताची किराणा बाजारपेठ सध्‍या जवळपास ४०० अब्ज डॉलरची उलाढाल करते. या तुलनेत ई-कॉमर्सचा व्‍यवहार केवळ ०.५ टक्‍के आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flipkart opens online grocery store supermart in mumbai