आपल्या पाळीव कुत्र्यांची आपण खूप काळजी घेतो. त्याला काही कमी पडू नये म्हणून आपलं त्याच्याकडे सतत लक्ष असत. घरातला कुत्रा आपला साथीच असतो. त्यामुळे तो आपल्यासोबत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सोबत असतो. यावेळी अनेकदा आपण जेवताना किंवा अन्य काही पदार्थ खाताना त्यांनाही ते पदार्थ खायला देतो. पण जे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत ते त्यांच्यासाठी असतीलच असं नाही. त्यामुळे खाली दिलेले ५ खाद्य पदार्थ तुमच्या कुत्र्याला आहारात देऊ नका.
१) चॉकलेट
कुत्र्यांना खायला न देण्याच्या यादीमध्ये चॉकलेट नंबर १ वर आहे. अहवालानुसार चॉकलेटमध्ये थियोब्रोमाइन आहे, जे माणसांसाठी वाईट नाही. परंतु पाळीव प्राण्यांच्या आरोग्यासाठी चॉकलेट धोकादायक ठरू शकते. यामुळे उलट्या होणे, झटके येणे, डिहायड्रेशन होऊ शकते. तसेच मृत्यू देखील होऊ शकतो.
२) मीठ
शक्यतो कोणतेही खारट खाद्यपदार्थ आपल्या पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक असतात. यामुळे सोडियम आयर्नची विषबाधा होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या कुत्र्याला जास्त मीठ असलेले पदार्थ खाऊ घालत असाल तर त्यामुळे त्यांला उलट्या, शरीराचे उच्च तापमान जाणवू शकते.
३) लसूण आणि कांदा
आपल्या रोजच्या वापरातील हे दोन्ही पदार्थ आपल्या कुत्र्यांसाठी चांगले नाहीत. डॉग टाईमनुसार, कांदा आणि लसूण. यामुळे कुत्र्यांच्या लाल रक्तपेशी नष्ट होऊ शकतात. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवू शकतो. त्यांना श्वास घेण्यासाठीही त्रास होऊ शकतो.
४) दूध, चीज आणि दुग्धजन्य पदार्थ
आपल्या कुत्र्यांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ देणे बंद करा. दुधातील साखर कुत्र्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे त्यांना स्वादुपिंडाचाही त्रास होऊ शकतो.
५) कच्चे मांस, मासे आणि अंडी
बरेच लोक त्यांच्या कुत्र्यांना कच्चे मांस आणि अंडी खायला देतात. पण असे पदार्थ देतांना ते संपूर्णपणे साफ करून द्या. नाही तर त्यात उपस्थित बॅक्टेरियामुळे कुत्र्यांना संसर्ग होऊ शकतो.