दिवाळी, सण-समारंभ म्हटले की गोडाचे पदार्थ, तेलकट-तुपकट, तळणीचे, रस्त्यावरचे असे सर्व कमी आरोग्यदायी पदार्थ आपण अगदी सहज आणि चवीने खात असतो. दरम्यान, आपला व्यायाम आणि सुट्यांमुळे काम हेदेखील बंद असते. या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या शरीर, आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे सण-समारंभ संपल्यानंतर काहीही करून आपल्या आरोग्याची गाडी रुळावर आणायची असेल, तर काही डिटॉक्स प्लॅन पाळणे गरजेचे असते. सणानंतर आपल्या आरोग्याची काळजी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी घेऊ शकतो ते पाहू.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळीनंतर आरोग्याची काळजी घेणारे हे सात पदार्थ पाहा

१. भाज्यांचे सॅलड

काकडी, टोमॅटो, ब्रोकोली, लेट्युस, कांदा, गाजर यांसारख्या भाज्यांचा समावेश असणारे सॅलड खाल्ल्याने तुमच्या शरीरातील अनावश्यक घटकांचा निचरा होण्यास मदत होऊ शकते. या सॅलडमधून तुम्हाला फायबर, शरीरासाठी उपयुक्त अशी खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात मिळते. या सॅलडवर साध्या मिठाऐवजी काळ्या मिठाचा वापर करू शकता.

हेही वाचा : हिवाळ्यात लिंबाच्या मदतीने ठेवा वजनावर नियंत्रण; पाहा लिंबूपाणी पिण्याचे हे पाच फायदे

२. दही

दह्यामध्ये असणाऱ्या आणि शरीरासाठी उपयुक्त असलेल्या जीवाणूंमुळे पोटाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. चार-पाच दिवसांमध्ये आपण जे गोड, तेलकट असे पदार्थ खातो; त्यामुळे पोटाला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पोटाचे तंत्र सुरळीत करण्यासाठी दही खाणे फायद्याचे ठरू शकते. ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशी मंडळी गोड दह्याचे सेवन करू शकतात.

३. ग्रीन टी

रोजच्या साखर घातलेल्या चहाऐवजी ग्रीन टी पिऊ शकता. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन्स [Catechins] नावाचे अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असून, त्यामुळे शरीरातील अनावश्यक घटकांना शरीराबाहेर बाहेर काढण्यास मदत होते. परिणामी तुमचे आरोग्य उत्तम राहते.

४. फळे

लिंबू, संत्री यांसारख्या फळांमध्ये क जीवनसत्त्व सर्वाधिक असते. अशा फळांच्या सेवनानेही शरीरतील अनावश्यक घटकांचा निचरा होण्यास मदत होते. त्यासोबतच डाळिंब, बेरी, कलिंगड व द्राक्ष या फळांमध्ये फायटोकेमिकल्स [Phytochemicals] नावाचे अँटिऑक्सिडंट्स असल्याने किडनीलादेखील शरीरातील घातक घटक बाहेर टाकून देण्यासाठी मदत मिळते.

५. हळद

हळदीमध्ये अँटीइंफ्लेमेट्री आणि शरीराला डिटॉक्स करणारे घटक असल्याने याचा शरीराला चांगला फायदा होतो. त्यामुळे पदार्थांमध्ये हळदीचा समावेश केल्याने किंवा कोमट पाण्यात हळद घालून पिण्याने शरीरातील अनावश्यक घटकांचा निचरा होण्यास मदत मिळू शकते.

६. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन

आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. पालक, मेथी, ब्रोकोली यांसारख्या पालेभाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स व फायबर भरपूर प्रमाणात असते. या भाज्यांच्या सेवनाने पचन क्षमता सुधारते आणि शरीरात नको असलेले घटक शरीराबाहेर काढण्यास मदत होते.

७. पाणी

शरीराचे, पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी पाणी हा फार महत्त्वाचा घटक आहे. आपण दिवाळीदरम्यान किंवा कोणताही सणादरम्यान जे पदार्थ खातो, त्यामुळे आपल्या पोटात पित्ताचे प्रमाण वाढते. अशात भरपूर पाणी पिण्यामुळे पित्ताचा त्रास कमी होऊन, शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. त्याचसोबत किडनीचे कार्य सुरळीत राहून शरीराला घातक असणारे पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे भरपूर पाणी पिणे हेदेखील आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.

[टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून, यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foods you should eat after diwali festival to keep your health on track try this 7 detox foods dha