स्वीडनमधील संशोधकांचा दावा
कर्करोग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील पेशींच्या प्रतिमाचित्रणात कर्करोगग्रस्त पेशींमध्ये आजूबाजूच्या पेशींपेक्षा साखरेचे प्रमाण जास्त दिसून येते, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे.
स्वीडनमधील ल्युंड विद्यापीठातील वैज्ञानिक लिंडा नटसन यांनी सांगितले की, जर आपण शरीराचे प्रतिमाचित्रण करताना धातूऐवजी साखरेचा वापर केला तर त्याचे सकारात्मक मानसिक परिणामही दिसतात आणि रुग्ण शांत होतो. गाठीचे गुणधर्म लक्षात घेऊन त्यांची तपासणी कमी प्रमाणात साखर इंजेक्शनने टोचून ती गाठ किती साखर शोषून घेते हे समजते व ती गाठ जितकी जास्त साखर शोषेल तितकी ती कर्करोगाची असण्याची शक्यता जास्त असते.
नटसन यांनी जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या वैज्ञानिकांसमवेत संशोधन केले आहे. त्यात चुंबकीय सस्पंदनाची नवी स्थानशास्त्रीय पद्धत शोधली गेली. नैसर्गिक साखर ही धातूऐवजी वापरून यात निदान केले जाते. नैसर्गिक घटक म्हणून साखरेचा वापर यात करण्यात आला. त्यातील निदानाचे निष्कर्षही परिणामकारक आहेत. जितकी साखर जास्त तितका पेशीला कर्करोगाचा धोका अधिक असतो याबाबत मेंदूचा कर्करोग असलेल्या तीन व निरोगी चार व्यक्तींवर प्रयोग करण्यात आले.
धातूवर आधारित घटकांपेक्षा साखर जास्त विश्वासार्ह ठरते व त्यामुळे कर्करोग निदानाचा खर्चही कमी होतो, असे नटसन यांचे म्हणणे आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)