बेड ही अशी जागा आहे जिथे प्रत्येकजण आपल्या मनाचा राजा असतो. म्हणजे दिवसभराच्या धावपळीनंतर आराम करण्याची हक्काची जागा म्हणजे बेड. त्यामुळे कधी एकदा बेडवर जाऊन पडतोय असं सर्वांनाच होते. आणि एकदा का झोपण्यासाठी आपण बेडवर गेलो की कसेही लोळत पडतो. कोणी छताकडे तोंड करुन, कोणी एखाद्या कुशीवर तर कोणी पालथे झोपतात. मात्र, यापैकी पालथे झोपणाऱ्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. म्हणजे काही काळासाठी पालथे झोपल्यास हरकत नाही. मात्र, दीर्घकाळ किंवा रात्रभर पालथे झोपणे शरीरासाठी अपायकारक असते.
मणक्यावरील ताण वाढतो
पोटावर झोपल्याने मणक्यावर वाईट परिणाम होतो. पोटावर झोपताना मणक्यावर येणार ताण हा छताकडे तोंड करुन झोपताना येणाऱ्या ताणापेक्षा अधिक असतो. याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही पोटावर झोपता तेव्हा पोटावर अधिक भार येतो त्यामुळे मणका वाकला जातो. मणका हा शरीराचा मुख्य आधार असतो. शरीरातील सर्व महत्वाच्या अवयवांकडे जाणाऱ्या मज्जातंतू मणक्याशी संबंधित असतात. त्यामुळे मणक्यावर ताण आल्यास शरीराचा इतर भाग बधीर होऊन वेदना होण्याची शक्यता असते.
पाठीवर वाईट प्रभाव
मणक्याच्या दुखण्याबरोबरच पोटावर झोपल्यामुळे सांधे दुखणे, मानेच्या वेदना आणि पाठदुखीची समस्या होऊ शकते. त्यामुळे झोप पूर्ण करणे अशक्य होते. अपूर्ण झोपेमुळे दिवसभर थकवा जाणवत राहतो.
मानेच्या वेदना
पोटावर झोपताना तुम्ही डोके उजवीकडे किंवा डावीकडे करुन झोपता. त्यामुळे मणका आणि मान एका सरळ रेषेत नसतात. तुम्हाला मान वळवावी लागते त्यामुळे मानेवर ताण येतो आणि मान दुखते. हे दुखणे एका रात्रीत होत नसले तरी सतत पोटावर झोपणाऱ्यांना मानेचा त्रास जाणवतोच. पोटावर झोपल्याने होणाऱ्या मानेच्या आजारांपैकी सर्वात जास्त त्रासदायक आजाराला हार्नियेटेड डिस्क म्हणतात.
गर्भवती महिलांसाठी धोकादायक
गर्भवती महिलांनी बाळा होण्याच्या काही महिन्याआधीपासून पोटावर झोपणे टाळावे असं म्हणतात. मात्र, गर्भधारण केल्यापासून त्यांनी पोटावर झोपणे टाळायला हवे. पोटावर झोपल्याने सर्व वजन गर्भावर जाते. तसेच मणक्यावर ताण आल्याने पाठ दुखीचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे पोटावर झोपल्याने गर्भातील बाळाला हलचाल करायला जागा मिळत नाही. २०१२मधील एका वैद्यकिय अभ्यासानुसार गरोदर महिलांनी डाव्या कुशीवर झोपल्यास गर्भाला होणारा रक्तपुरवठा फायद्याचा असतो.