Fresh ginger vs dried ginger: आपल्या आहारातील अनेक पदार्थ असे असतात की, जे वजन कमी करण्यासाठी परिणामकारक ठरू शकतात. त्यापैकी एक औषधीय पदार्थ म्हणजे आले. औषधीय गुणांनी युक्त असणारे आले हे शरीराला अनेक फायदे मिळवून देते.आल्याच्या सेवनामुळे शरीराला दाहविरोधी ताकद मिळते आणि स्नायूंना होणारा त्रास कमी करण्यास मदत मिळते. पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर घरगुती उपाय म्हणूनही आपण आल्याचा वापर करू शकता. आले भूक कमी करून वजन घटविण्यासाठी उपयुक्त ठरते. दरम्यान, कोरडे आले की ताजे आले? आरोग्यासाठी कोणते आले फायदेशीर ठरते ते पाहूया.
आले हा आपल्या सगळ्यांच्याच घरात वापरला जाणारा एक प्रसिद्ध मसाला आहे. चहापासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सगळ्याची चव वाढविण्याआठी आल्याचा आवर्जून वापर केला जातो. अनेक औषधी गुणधर्मांमुळे आयुर्वेदातदेखील आल्याला महत्त्वाचे स्थान आहे आणि आल्याचा दीर्घकाळापासून औषधी मसाला म्हणून उपयोग केला जात आहे. तुम्ही कोरडे आणि ताजे अशा दोन्ही प्रकारच्या आल्याचे सेवन करू शकता. मात्र, आरोग्यासाठी ताजे व कोरडे यापैकी कोणते आले चांगले आहे याबद्दल अनेकदा संभ्रम असतो. या लेखात आपण ताजे आले आणि कोरडे आले यांच्यातील फरक आणि तुमच्या आरोग्यासाठी कोणते आले चांगले आहे ते जाणून घेऊ.
ताजे आले
ताजे आले हा आल्याचा प्रक्रिया न केलेला प्रकार आहे; जो आपल्याला किराणा दुकानात वा फेरी विक्रेत्यांकडे आढळतो. हे आले हलके तपकिरी व आतमध्ये पिवळसर असते आणि मसालेदार अशी त्याची चव असते. ताज्या आल्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात; जे आरोग्यदायी फायद्यांमध्ये योगदान देतात.
ताज्या आल्यामध्ये क, ब६ ही जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम व पोटॅशियम हे घटकदेखील उच्च प्रमाणात असतात. निरोगी रोगप्रतिकार शक्ती राखण्यासाठी, चांगले पचन वाढविण्यासाठी व रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यासाठी हे पोषक घटक आवश्यक आहेत.
वाळलेले आले
कोरडे आले हे आले सुकवून किंवा ताज्या आल्याच्या मुळांना बारीक पावडर बनवून तयार केले जाते. ताज्या आल्यापेक्षा कोरड्या आल्याचा रंग फिकट पिवळा आणि चव अधिक तीव्र असते. कोरडे आले बहुतेकदा स्वयंपाक भाजण्याच्या पाकक्रियांमध्ये तसेच पारंपरिक औषधांमध्ये मसाला म्हणून वापरले जाते.
कोरड्या आल्यामध्ये क जीवनसत्त्वासारखी पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे नसतात. मात्र, तरीही ते लोह, कॅल्शियम आणि आहारातील फायबर यांसारख्या इतर पोषक घटकांनी समृद्ध असते. हे पोषक घटक त्याच्या संभाव्य आरोग्यदायी फायद्यांमध्ये योगदान देतात.
हेही वाचा >> तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात…
तुमच्या आरोग्यासाठी कोणते चांगले आहे?
ताजे आणि कोरडे आले या दोन्ही आल्यांमध्ये असंख्य आरोग्यदायी फायदे असतात आणि दोघांमधील निवड ही शेवटी वैयक्तिक पसंतीवर अवलंबून असते. जर तुम्ही अधिक प्रभावी आणि चवदार घटक शोधत असाल, तर ताजे आले हा उत्तम पर्याय असेल. परंतु, जर तुम्हाला अधिक सोईस्कर पर्याय हवा असेल, तर वाळलेले आले हा एक योग्य पर्याय आहे.