Jaya Kishori : प्रेरणादायी वक्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जया किशोरी यांचे असंख्य चाहते आहेत. आयुष्य कसे जगावे, आयुष्य जगताना माणसाने कोणती मुल्ये जपावीत, याविषयी त्या नेहमी प्रेरणादायी विचार व्यक्त करत असतात. त्यांनी सांगितलेले मूलमंत्र अनेक जण आचरणात आणतात. सोशल मीडियाचा सुद्धा त्या तितकाच प्रभावीपणे वापर करत त्यांच्या चाहत्यांना नवनवीन गोष्टी आणि माहिती सांगत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये त्या मित्र कसा असावा, हे सांगताना दिसतात.
या व्हिडीओमध्ये जया किशोरी सांगतात, “आपली संगत, आपला मित्र हा कृष्णासारखा असावा. शकुनी मामा सारखा नाही. तुमच्या जवळच्या पाच लोकांना आठवा ज्यांच्याबरोबर तुम्ही सर्वात जास्त बोलता किंवा आपल्या मनातील गोष्टी शेअर करता आणि विचार करा की हे लोकांची संगत चांगली आहे की वाईट. चांगली संगत असेल तर ठीक पण वाईट असेल तर अशा लोकांपासून दूर राहणे, कधीही चांगले आहे.”
iamjayakishori या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “घनिष्ठ मैत्री कशी निर्माण करावी?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरं बोललात..” तर काही युजर्सनी त्यांच्या अशा पाच मित्रांना कमेंट्समध्ये टॅग केले आहेत. अनेक युजर्सनी कमेंट्समध्ये जय हरी कृष्णा लिहिलेय.
जया किशोरी यांचे लाखो चाहते आहेत. त्या फक्त भारतातच नाही तर जगात सुद्धा तितक्याच लोकप्रिय आहेत. त्या कथावाचन, भजन आणि किर्तन करतात. याशिवाय त्या एक मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. त्यांना आधुनिक युगातील मीरा संबोधले जाते. त्यांचा जन्म १९९५ रोजी झाला. लहान वयापासूनच त्यांना अध्यात्माची ओढ लागली आणि त्यांनी हा मार्ग निवडला. अगदी लहान वयातच त्या लोकांच्या पसंतीस उतरल्या आणि खूप लोकप्रिय झाल्या. सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून त्या नवनवीन गोष्टी लोकांना सांगत असतात.