व्यक्तीचा स्वभाव ओळखणे हे फार कौशल्याचे काम असते. आपण येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे पाहू, ती रागीट असेल, ती शांत वाटते, ती हसऱ्या स्वभावाची वाटते, असे मनातल्या-मनात अंदाज बांधत असतो. पण जर तुम्हाला कुणी सांगितले की, व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे त्याच्या खाण्याच्या आवडींवरून सहज ओळखता येऊ शकते… तर?
अनेकदा व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या आवडी-निवडी यांमध्ये खूपच साधर्म्य आढळून येते. म्हणजे पटकन चिडणाऱ्या व्यक्तींना गोडापेक्षा तिखट पदार्थ अधिक आवडू शकतात; तर हसऱ्या व्यक्तींचे सहसा विरुद्ध असते, असे म्हटले जाते. इतकेच नाही, तर पदार्थ आणि स्वभाव यांवरून आपल्या भाषेत ‘तिखट स्वभावाच्या व्यक्ती’ असेदेखील काहींना म्हटले जाते. पण, आपण वडापाव, पाणीपुरी, छोले भटुरे असे जे चाट पदार्थ खातो, त्यावरून व्यक्तीचा स्वभाव कसा ओळखायचा याची ट्रिक आपण पाहणार आहोत. ही माहिती एनडीटीव्हीच्या एका लेखावरून मिळाली आहे. ती पाहू. तुम्हाला खाली दिलेल्या पदार्थांपैकी कोणता पदार्थ आवडतो आणि त्यात वर्णन केलेला स्वभाव तुमच्या स्वभावाशी मिळता-जुळता आहे का ते पाहा.
हेही वाचा : जगातल्या सर्वात मोठ्या फुलाला येतो ‘सडक्या मांसाचा’ वास! काय आहे याचे नाव, जाणून घ्या
पदार्थांवरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव
१. पाणीपुरी
पाणीपुरी न आवडणारे लोक क्वचितच सापडतात. मात्र, तुम्हाला जर पाणीपुरी खूपच आवडत असेल, तर तुम्ही मजा-मस्ती करणाऱ्या आणि खेळकर स्वभावाच्या व्यक्ती आहेत. कॉलेज, ऑफिस किंवा कोणत्याही ग्रुपमधे तुम्ही लोकप्रिय असून, तुमचा चाहतावर्ग मोठा आहे. तुम्हाला लहान लहान गोष्टींमधून आनंद घेता येतो. पाणीपुरीला जशी गोलगप्पा, पुचका, गुपचूप अशी वेगवेगळी नावे आहेत, त्याचप्रमाणे तुमचीदेखील अनेक टोपणनावे असू शकतात. तुमचा स्वभाव गप्पिष्ट असून, आयुष्यात तुम्ही आनंद देणाऱ्या, साहसी गोष्टी करण्यासाठी कायम तत्पर असता.
२. छोले भटुरे
छोले भटुरे आवडणाऱ्या व्यक्ती या राजेशाही जीवनशैलीची आवड असणाऱ्या व्यक्ती असू शकतात. तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असून, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती सदैव तुमच्याबरोबर असतात. तुमच्या पाठीशी असतात. कधी कधी तुम्ही अगदी अतिउत्साहीपणे वागू शकता. मात्र, तुमच्या अशा स्वभावामुळे इतरांना तुमच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी आवडते.
३. लिंबू मसाला सोडा
लिंबू मसाला सोडा आवडणाऱ्या व्यक्ती अगदी सगळ्यांमध्ये आनंदाने मिसळून जाणाऱ्या अशा ‘कूल’ स्वभावाच्या असतात. कुटुंबात, तसेच मित्रपरिवारात तुमचे व्यक्तिमत्त्व कायम आनंदी असते. तुम्हाला साध्या आणि सोप्या गोष्टींमध्ये अधिक रस असतो. गुंतागुंतीच्या गोष्टी हा पदार्थ आवडणाऱ्या व्यक्तींना फारशा आवडत नाहीत. तसेच तुम्ही स्वतःच्या सूत्रांचे पालन करता. कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची तुमची तयारी असली तरी गरज पडेल तिथे तुम्ही तुमचा चटपटीत स्वभाव दाखवून देता.
हेही वाचा : “आई मला काहीतरी पाहिजे…” म्हणत चिमुरडीने केले हैराण! पाहा हा मजेशीर व्हायरल Video
४. वडापाव
ज्या व्यक्तींना वडापाव प्रिय आहे, त्या व्यक्ती अगदी सहज स्वभावाच्या असतात. कुठे बाहेर जायचे असल्यास तुम्ही अगदी पाच मिनिटांत तयार असता. तुमच्या स्वभावामुळे इतर व्यक्ती तुम्हाला हुशार आणि बुद्धिमान समजतात. वडापाव आवडणाऱ्या व्यतींकडे कोणताही खोटेपणा नसल्याने ते सर्वांना प्रिय असतात.
५. जिलेबी
जिलेबी आवडणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव हा अगदी जिलेबीप्रमाणेच गोड असतो. मात्र, जिलेबी दिसते, तसेच गुंतागुंतीचे विचार कधी कधी या स्वभावाच्या व्यक्ती मांडतात. असे विचार किंवा कल्पना समोरच्या लोकांना समजणे अवघड जाते. तसेच, एखादी गोष्ट स्वतःच्या फायद्यासाठी कशी करून घ्यायची याची या स्वभावाच्या व्यक्तींचा चांगली माहिती असते. परंतु, एकंदरीत जिलेबी आवडणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव हा गोड, गोंधळात पडणारा मात्र मजेशीर असा असतो. त्यांच्या अशा स्वभावामुळे लोकं त्यांचे कौतुक करत असतात.
अर्थात, हे सर्व स्वभाव हे अंदाजे आहेत. त्यामुळे तुम्हाला आवडणाऱ्या पदार्थासह तुमचा स्वभाव जुळतो आहे का? तसेच तो कितपत जुळतो आहे याकडे मजा म्हणून पाहावे.
[टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.]