भूमध्य प्रदेशाचा (मेडिटेरानियन) आहार म्हणून प्रसिद्ध असलेल्या खाद्यपदार्थामुळे खेळाडूंची सहनशक्ती- दम धरण्याची क्षमता अगदी चार दिवसांतच सुधारू शकते, असा दावा अभ्यासकांनी केला आहे. अशा आहारात फळे, पालेभाज्या यांचा भरपूर समावेश असतो आणि यात प्रक्रिया केलेले मांस, दुग्धजन्य पदार्थ टाळले जातात.

भूमध्य समुद्राच्या सभोवतालच्या प्रदेशातील लोकांच्या आहारावरून हा पालेभाज्या, फळांचा समावेश असलेला आहार ओळखला जातो. याबाबतचा अभ्यास ‘अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशन’च्या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. पाश्चात्त्य आहार सेवन करणाऱ्या धावपटूंनी भूमध्य आहार घेण्यास सुरुवात केल्यावर त्यांच्या धावण्याच्या वेगात सहा टक्के सुधारणा झाल्याचे या अभ्यासात दिसून आले. हे धावपटू ‘फाइव्ह के’ प्रकारच्या धावण्याच्या शर्यतीत सहभागी झाले होते. या प्रकारात रस्त्याने पाच किलोमीटर धावावे लागते.

अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठाच्या संशोधकांनी खेळाडूंची भूमध्य आहार आणि पाश्चिमात्य आहार घेतल्यानंतर, अशी वेगवेगळ्या काळात चाचणी केली. भूमध्य आहाराचे वैशिष्टय़ म्हणजे यात फळे, पालेभाज्या, कठीण कवचाची फळे-दाणे, ऑलिव्ह तेल, कडधान्य यांचा समावेश असतो. या आहारात प्रक्रियायुक्त मांस व दुग्धजन्य पदार्थ, अतिशुद्धीकरण (रिफाइण्ड) केलेली साखर-तेल, संपृक्त चरबी यांचा वापर केला जात नाही. याच्या तुलनेत पाश्चात्त्य आहारात फळे-भाज्यांचा आणि प्रक्रिया न झालेल्या तेलाचे प्रमाण कमी असते. भूमध्य आहार हा अत्यंत आरोग्यदायी असल्याचे सिद्ध झाले आहे, असे सेंट लुईस विद्यापीठातील प्रा. एडवर्ड वेईस यांनी सांगितले. हा आहाराच्या वेदनाशामक, अ‍ॅण्टिऑक्सिडंट (ऑक्सिडीकरणरोधी) गुणधर्मामुळे आणि अधिक अल्कलीकारक सामू (पीएच), नाएट्रेटमुळे तो कार्यक्षमतावाढीस उपयुक्त ठरत असावा, असे ते म्हणाले.

या आहारामुळे तात्काळ किंवा काही दिवसांतच खेळाडूंची कामगिरी सुधारली. परंतु हा आहार घेणे थांबवल्याबरोबर त्याचे फायदे मिळणे बंद झाले. त्यामुळे तो नियमित घेण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

Story img Loader