डॉ. शारदा महांडुळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निसर्गाने मनुष्याचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी बहुमोल अशा फळांची निर्मिती केली आहे. फळांच्या स्वरूपात तयार अन्न आपल्या आरोग्यासाठी निर्माण करून निसर्गाने आपल्याला अनमोल अशी देणगीच दिली आहे. भूक लागल्यानंतर न शिजवता न कापताही जसेच्या तसे पटकन आपण फळ खाऊ शकतो. इतर कुठलेही अन्न हे प्रक्रिया केल्याशिवाय खाता येत नाही, फक्त फळे त्याला अपवाद आहेत व हीच खरी फळांची महती आहे.

शरीरास पोषक व नैसर्गिक अन्नतत्त्वांचा मुबलक साठा फळांमध्ये असतो. तसेच शरीरास उपयुक्त खनिजे, जीवनसत्त्वे, क्षार, एन्झाईम्स ही मूलतत्त्वे फळांमध्ये असतात. नियमितपणे फलाहार सेवन करणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य उत्तम असते. कारण झाडूने जसा आपण कचरा साफ करतो, अगदी तसेच फळे आपल्या शरीरातील अनावश्यक साचलेला कचरा (टॉक्झिन्स) काढून टाकण्यास मदत करतात. फळे नैसर्गिक अन्न असल्यामुळे सहज पचतात, रक्त शुद्ध करतात, पचनमार्ग स्वच्छ ठेवतात व शरीरातील अंतर्गत साचलेली विषेही मलमूत्राद्वारे बाहेर काढतात. ताजी व सुकी फळे (सुकामेवा) ही दोन्हीही शरीराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त असतात.

हेही वाचा >>> व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

फळांचे उपयोग

१ फळांमध्ये असणारी खनिजे, जीवनसत्त्वे, एन्झाईम्स यामुळे शरीराची झालेली झीज भरून निघते व नवीन पेशी तयार होण्यास चालना मिळून शरीराची वाढ योग्य रितीने होते.

२  फळांमध्ये असणाऱ्या तंतुमय पदार्थामुळे (फायबर) व पाचक स्रावांमुळे आतडय़ांचे आरोग्य चांगले राहून घेतलेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते व नियमित फळे सेवन केल्याने आतडय़ांची हालचाल नियमित होऊन शरीरातील टाकाऊ भाग मल स्वरूपात मलाशयापर्यंत ढकलला जातो व त्यामुळे शौचास साफ होते.

३ फळांमध्ये असणाऱ्या आद्र्रतेमुळे शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहून वारंवार तहान लागण्याची भावना कमी होते व शरीरास शीतलता प्राप्त होते.

४  फळांमध्ये असणाऱ्या रसांमुळे व पोटॅशिअम, सोडिअम व क्षार व खनिजांमुळे मूत्राचे उर्त्सजन जास्त प्रमाणात होते व त्यामुळे शरीरातील दूषित घटक मूत्राद्वारे बाहेर टाकले जातात. तसेच अंतर्गत अवयव, पचनसंस्था, रक्तवाहिन्या यांमधील विषद्रव्ये घामाद्वारे व मलाद्वारे शरीराबाहेर टाकली जातात.

५  फळे नियमित खाल्ल्याने त्यामध्ये असणारी नैसर्गिक फलशर्करा लगचेच रक्तात शोषली जाऊन शक्ती व उत्साह प्राप्त होतो.

६  फळांमध्ये असणाऱ्या जीवनसत्त्वांमुळे शरीराची वाढ व्यवस्थित होते व शरीराची जंतूविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे अनेक प्रकारचे रोग टाळले जातात.

हेही वाचा >>> नाश्ता न करणे ठरू शकते कर्करोगाचे कारण ! जाणून घ्या नाश्ता कधी आणि का करावा ?

सावधानता

ताजी फळे स्वच्छ धुऊन, पुसून जशीच्या तशी संपूर्ण खावीत. फळे कापल्यास त्यातील गुणधर्माची मात्रा कमी होते, तसेच फळ शिजविल्यास त्यातील पौष्टिक क्षार व पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ यांचा काही भाग नष्ट होतो. म्हणून सहसा फळ न शिजविता खावे. फळे ही नेहमी ताजी खावीत. फ्रीजमध्ये साठविलेली फळे खाऊ नयेत. तसेच फळे ही दुपारच्या वेळेत खावीत. आयुर्वेदानुसार फक्त एकावेळी फळे खावीत. दूध व फळे एकत्र (फ्रुटसॅलड) करून खाऊ नयेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fruits health benefits health benefits of fruits importance of healthy fruits zws
Show comments