Fungal Infection: पावसाळा सुरु झाल्यामुळे अखेर उन्हाच्या तडाख्यापासून मिळाला आहे. पावसाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. पावसाळा सुरू झाला की अनेक असे आजार होतातच. पावसाळ्यात अनेक आजार आणि संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो. पावसाळ्यामध्ये सर्दी, ताप यांसारख्या आजारांसोबत अनेक संसर्गजन्य आजारही वेगाने पसरतात. पावसाळ्यात आपण भिजल्यामुळे किंवा सतत पाण्यात राहिल्यामुळे फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीजन्य आजार होण्याचा धोकाही जास्त असतो. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची योग्यप्रकारे काळजी घेण्याची गरज असते. नाहीतर या फंगलसारख्या इन्फेक्शनना बळी पडण्याची वेळ येते. असं होऊ नये म्हणून काय करायचं ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पावसाच्या घाणेरड्या पाण्यामुळे कधीकधी फंगल इंफेक्शनची समस्या उद्भवते. यामध्ये त्वचेवर खाज येणे, त्वचा लाल होणे, लहान पुरळ येणे, हाता – पायांवर चट्टे उठणे अशा अनेक प्रकारे फंगल इंफेक्शन होऊ शकते. फंगल इनफेक्शन तेव्हाच होते जेव्हा बाहेरील बुरशी आपल्या शरीरातील काही खास भागांवर येऊन वाढते. असे झाले आणि त्यातही आपली रोगप्रतिकार शक्ती कमी असेल, तर आपले शरीर या फंगसला प्रतिकार करू शकत नाही. म्हणूनच अशा फंगल इंफेक्शनवर तातडीने उपचार करणे गरजेचे असते.फंगल इंफेक्शन दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊयात.

पुरेसे पाणी प्या

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरेसे पाणी प्यायल्याने तुमची त्वचा निरोगी राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. योग्य आहार घ्या. जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहारामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते, यामुळे तुमचं शरीर फंगल इन्फेक्शन प्रतिरोधक होईल.

त्वचा कायम कोरडी ठेवा

जास्त ओलाव्यामुळे त्वचेवर बुरशीची वाढ होऊ शकते. जेव्हा आपण पावसात भिजून येतो त्यानंतर आपली संपूर्ण त्वचा पुसून कोरडी करावी. बुरशीचा धोका हाताखाली, पायांच्या जांघांमध्ये, स्तन आणि पायांची बोटे यांच्यामध्ये जास्त असतो, म्हणून हे भाग चांगले पुसून कोरडे करावेत.

मीठाच्या पाण्यात पाय बुडवावेत.

पावसाळ्यात अस्वच्छ पाण्यामुळे पाय खराब झाले असतील किंवा इन्फेक्शन झाले असेल तर हा उपाय नक्की करून पहा. घरी आल्यावर पाय स्वच्छ धुवा. त्यानंतर एका टबमध्ये सोसवेल इतके गरम पाणी घेऊन त्यात दोन चमचे मीठ घालावे. नंतर त्यात पाय बुडवून बसावे. अर्ध्या तासासाठी पाया मीठाच्या पाण्यातच ठेवावे. नंतर बाहेर काढून नीट कोरडे करावे. बोटांच्या मधील जागाही नीट टिपून कोरडी करावी. मीठ हे अँटी-बॅक्टेरिअल असते, त्यामुळे सूज आणि इन्फ्केशन कमी होण्यास मदत होते. तसेच त्यामुळे जळजळ व खाजेचा त्रासही कमी होतो.

हेही वाचा >> कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या? फक्त ‘हे’ दोन योगा करा; नेहमीच दिसाल तरुण

वैयक्तिक गोष्टी शेअर करणे टाळा

टॉवेल, कपडे किंवा शूज यांसारख्या वैयक्तिक वस्तू कुणाच्या वापरुही नका आणि कुणाला वापरायला देऊही नका.कारण यामुळे बुरशीजन्य संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरण्याचा धोका वाढू शकतो.

पावसाळ्यात फंगल इंफेक्शनचा जास्तच त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.