गरब्याला जायचं म्हटलं तर नटूनथटून गेलं पाहिजे. म्हणजे मांगटिका, बाहूंना लावायचे तोडे, कडे, कमरपट्टा, झुमका, झांजर, पायातले वाळे यांची खरेदी होतेच. इतक्या सा-या दागिन्यांचा वापर करावाच असं नाही. त्याऐवजी साधा पण पारंपरिक लुक देण्याचे अनेक पर्याय आहेत.
निऑन कलरचा ट्रेण्ड सध्या खूपच चालतोय, त्यामुळे निऑन कलरचे खडे आणि त्याला गोल्डन कलरची कडा असलेले नेकलेस बाजारात खूप पाहायला मिळतात. जर तुम्ही जीन्स आणि टॉप घालून जाणार असाल आणि तुम्हाला फंकी लूकसोबत ट्रेडिशनल टच द्यायचा असेल, तर अशा नेकलेसचा वापर केल्यामुळे तुम्हाला एक फंकी कम ट्रॅडिशनल लूक मिळेल आणि नवरात्रीला गरबा किंवा दांडियासाठी हे खूप शोभून दिसेल.
जर तुम्ही साधा कुर्ता घालून जाणार असाल, तर त्यावर तुम्ही एखादा ऑक्साईडचा हार, कडा घालू शकता. तुमचा कुर्ता जर प्लेन आणि भडक रंगाचा असेल तर हे दागिने त्यावर शोभून दिसतील. सध्या स्टोनने बनवलेले नेकलेस बाजारात आले आहेत. काही नेकलेसमध्ये पितळीचा, ऑक्साईडचा वापर करून बनवले जातात पण त्यांना एकत्र बांधण्यासाठी काळ्या रंगाच्या लोकरीच्या धागाचा वापर केला जातो, त्यामुळे फिकट रंगाच्या कुर्त्यांवर असे नेकलेस जास्त उठून दिसतील. तुम्ही घातलेला ड्रेस जर भरगच्च नक्षीकामाचा असेल, त्यावर खूप वर्क केलेलं असेल तर तुम्हाला जास्त दागिन्यांची आवश्यकता नाही. तुम्ही त्यावर त्या ड्रेससाठी मॅचिंग असे मोठे झुमके घातले, तरी ते पुरेसे असेल. हातातही खूप बांगडया घालण्याऐवजी एक बारीकसा कडा घातला तरी ते छान दिसून येईल. एक तर तुमचा ड्रेस भरगच्च आणि त्यात तुम्ही दागिनेसुद्धा खूप घातलेत तर पाहतानादेखील ते फार विचित्र दिसेल.

Story img Loader