खव्याचे चहा मोदक
साहित्य :
१ कप मावा, १ कप बारीक केलेली साखर, १ चमचा वेलची पूड, २ चमचे चहा मसाला पावडर,
कृती :
प्रथम एका कढईत खवा १० ते १२ मिनिटे भाजून घ्या. जोपर्यंत कढईतून मावा सुटू लागत नाही, तोपर्यंत भाजा.
नंतर त्यात साखर घाला आणि पाच ते सात मिनिटे भाजून घ्या. नंतर पूर्णपणे थंड होऊ द्या. कमीत कमी अर्धा ते एक तास लागेल.
नंतर त्यात वेलची पूड टाका. चहा मसाला टाकून चांगले एकजीव करा आणि मळून घ्या.
नंतर एक गोळा घेऊन मोदकाच्या साच्यात भरून आणि मोदकाचा आकार देऊन मोदक तयार करून घ्या.
या मिश्रणातून १० ते १२ मोदक तयार होतात.
केळी मावा मोदक
साहित्य :
१ कप मावा, ३ केळी बारीक काप केलेली, अर्धा कप साखर (बारीक केलेली), १ चमचा वेलची पावडर, १ चमचा व्हॅनिला इन्सेस
कृती :
प्रथम एका कढईत केळी आणि साखर टाकून ५ ते १० मिनिटे परतून घ्या. म्हणजे केळी चांगली एकजीव होऊन मिश्रण तयार होईल. नंतर थंड होऊ द्या. (कॅरमलसारखा रंग येईल.)
नंतर मावा एक कढईत ५ ते १० मिनिटे भाजून घ्या आणि थंड होऊ द्या.
दोन्ही मिश्रणे थंड झाल्यानंतर माव्याचे मिश्रण मळून घ्या. नंतर त्यात केळीचे मिश्रण टाका आणि चांगले एकजीव करा. त्यात व्हॅनिला इन्सेस आणि वेलची पावडर टाका. मिश्रण घट्ट झाल्यास आणि गरज भासल्यास थोडे दूध घाला.
आता मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून मोदकाच्या साच्यात टाकून आकार द्या आणि मोदक तयार करून घ्या.
या मिश्रणातून ५ ते ६ मोदक तयार होतील.
चव खूप छान असते.
मुखवास लाडू
साहित्य :
२ कप बारीक किसलेले सुके खोबरे, १ चमचा वेलची पूड, २ टेबलस्पून बडीशेप भाजून घेतलेली, ३ टेबलस्पून खाण्याचे पान बारीक कापलेले, अर्धा कप बारीक वाटलेली साखर, १ टेबलस्पून गुलकंद, १ टेबलस्पून तूप
कृती :
प्रथम एका कढईत तूप घेऊन त्यात खोबरे टाका आणि २ ते ३ मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात साखर, वेलची पूड टाका.
८ ते १० मिनिटे चांगले परतून घ्या. नंतर गॅस बंद करा.
खाली उतरवून मिश्रणात बडीशेप, गुलकंद, टाकून मिश्रण चांगले एकजीव करा आणि ताटात पान पसरवून घ्या.
मिश्रणाचे छोटे लाडू करून बारीक कापलेल्या खाण्याच्या पानांनी पूर्णपणे कोट करून घ्या. लाडूचा आकार द्या.
हे मुखवास लाडू प्रसादाच्या स्वरूपात द्या.
एवढय़ा मिश्रणात ८ ते १० लाडू तयार होतात.
गुळ पापडी
साहित्य :
१ कप गव्हाचे पीठ, १ कप गूळ (चिक्कीचा बारीक केलेला गूळ), १ मोठा चमचा वेलची पूड, १/२ कप साजुक तूप, ३ मोठे चमचे बटर
कृती :
प्रथम एका कढईत तूप टाकून थोडेसे गरम झाल्यावर त्यात गव्हाचे पीठ टाका आणि लालसर भाजून घ्या.
नंतर त्यात वेलची पूड टाकून गॅस बंद करा. त्यात गूळ आणि बटर घाला आणि चांगले हलवून घ्या. आता गॅस सुरू करा आणि ५ ते ७ मिनिटे मिश्रण परतवा.
गॅस बंद केल्यानंतरही २ ते ३ मिनिटे मिश्रण परतवत राहा.
नंतर एका ताटाला तूप लावून हे गूळ पापडीचे मिश्रण त्यात घाला आणि पसरवा. एकजीव करून सुरीने शंकरपाळीच्या आकारात कापून घ्या. अर्धा तास तसेच ठेवा.
नंतर गूळ पापडी ताटातून काढा. हा पदार्थ एक महिना टिकतो. डब्यातसुद्धा देता येतो.
टीप : हा पदार्थ तयार करणे सोपे आहे, मात्र खूप लक्षपूर्वक काम करावे लागते. मिश्रण गरम असताना ताटात टाकून थापले तर चिवट होऊ शकते. पीठात गूळ टाकताना गॅस बंद करा.
शेंगदाणा रबडी
साहित्य :
दूध अर्धा लिटर (३ कप दूध), अर्धा कप साखर, १ चमचा वेलची पूड, अर्धा कप शेंगदाण्याचे जाडसर कूट, १ चमचा केसर दुधात घोळवलेले, १ चमचा बारीक काप केलेला सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ता), १ मोठा चमचा साजुक तूप
कृती :
शेंगदाण्यांचे जाडसर कुट करा.
नंतर एका कढईत तूप टाकून ५ ते ७ मिनिटे कूट भाजून घ्या. आणि थंड होऊ द्या.
एका पातेल्यात दूध गरम करा. एक उकळी आल्यानंतर त्यात साखर आणि वेलची पूड टाका आणि दोन-तीन वेळा उकळी येऊ द्या.
त्यात शेंगदाण्याचे कूट आणि केसर टाकून २ ते ४ उकळी येऊ द्या. सतत हलवत राहा आणि त्यात सुक्या मेव्याचे थोडे काप घाला. शेंगदाणा रबडी चांगली हलवून घ्या. उरलेला सुका मेवा टाकून एक उकळी येऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा. रबडी चांगली थंड होऊ द्या. फ्रिजमध्ये ठेवा आणि गारेगार वाढा.
टीप : एकच लक्षात ठेवा शेंगदाणे जाडसर वाटणे आवश्यक आहे. बारीक केल्यास मिश्रण तळाशी चिकटेल आणि करपेल. हा पदार्थ १० मिनिटांत तयार होतो आणि उपवासालासुद्धा चालतो. नवीन रेसिपी आहे. शेंगदाणे वापरले आहेत, हे कोणाला कळणारही नाही.
बेसन रवा बडीशेप बर्फी
साहित्य :
१ कप बेसन, अर्धा कप बारीक रवा, १ कप बारीक केलेली साखर, १ चमचा बडीशेप (भाजून घेतलेली), १ चमचा वेलची पूड, ३ टेबल स्पून तुप (अर्धा कप तूप) दोन्ही वेगवेगळे तूप लागेल.
कृती :
प्रथम एका कढईत तूप घ्या. त्यात रवा लालसर होईपर्यंत भाजून घ्या आणि बाजूला काढून ठेवा.
दुसऱ्या कढईत अर्धा कप तूप घेऊन त्यावर बेसन लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
नंतर दोन्ही एकत्र करून ५ मिनिटे भाजा. त्यात बडीशेप, वेलची पूड आणि साखर टाका. ३ ते ४ मिनिटे परतवा.
आता ताटाला तूप लावून घ्या आणि बर्फीचे मिश्रण टाका. मिश्रण थापून घ्या. काप करा. एक तास तसेच ठेवा. या मिश्रणातून बर्फीचे छोटे १० ते १५ तुकडे तयार होतात.
टीप : बडीशेपमुळे उत्तम चव येते. तरीही ज्यांना बडीशेप आवडत नाही, त्यांनी तिचा वापर टाळला तरीही चालेल.
काजू-शेंगदाणा चिक्की
साहित्य :
१ कप तुकडा काजू, अर्धा कप शेंगदाणे (भाजून साल काढलेले आणि एकाचे दोन भाग केलेले), १ कप गूळ, अर्धा कप पाणी, २ टेबल स्पून तूप
कृती :
प्रथम एका कढईत तूप आणि गूळ घ्या. गूळ वितळेपर्यंत सतत हलवत राहा.
त्यात २ टेबल स्पून पाणी घाला आणि एक उकळी येऊ द्या. त्यात काजू आणि शेंगदाणे घाला आणि सतत हलवत राहा. एक गोळा तयार होईल. कढईत गोळा सुटा होऊ लागला की तयार आहे, हे ओळखावे.
नंतर एका ताटाला तूप लावा आणि त्यात हे मिश्रण घाला. थापून घ्या. ५ मिनिटे तसेच ठेवून नंतर काप पाडा. अर्धा तास तसेच राहू द्या आणि कडक झाल्यावर खायला द्या.
टीप : गुळाचा पाक कधी-कधी जळतो. पाणी टाकल्यास तो जळणार नाही. गूळ वितळला की लगेच पाणी घाला आणि काजू व शेंगदाणे घाला.
(सौजन्य – लोकप्रभा )