Gauri Ganpati 2022: सप्टेंबर महिन्याची चाहूल लागताच लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरु होते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होते. यंदा भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच ३१ ऑगस्टला गणराज भक्तांच्या भेटीला येणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये गणपतीसह ज्येष्ठा गौरीचे सुद्धा आगमन होते. ज्येष्ठा गौरी पूजन महाराष्ट्रात विविध पद्धतीने केले जाते. गौरी ही साक्षात माता पार्वतीचे स्वरूप आहे, स्वतः पार्वती माता घरी माहेरपणाला येते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसात माहेरवाशिणीच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. यंदा महाराष्ट्रात ज्येष्ठा गौरीचे आवाहन कधी आहे याची तारीख, वेळ व पूजा विधी आपण जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन, असे हे तीन दिवसांचे मूळ व्रत आहे. याला ‘ज्येष्ठागौरी पूजन’ असे म्हटले जाते. यंदा ३ सप्टेंबर रोजी गौरी आवाहन व ५ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे. ४ सप्टेंबर गौराईचे पूजन केले जाणार आहे.

पंचांगानुसार ज्येष्ठागौरी पूजन तिथी

  • ज्येष्ठा गौरी आवाहन तारीख: ३ सप्टेंबर (शनिवार )
  • वेळ: रात्री १० वाजून ५६ मिनिटांपर्यंत
  • ज्येष्ठा गौरी पूजन तारीख: ४ सप्टेंबर (रविवार)
  • ज्येष्ठा गौरी विसर्जन तारीख: ५ सप्टेंबर (सोमवार)
  • वेळ: रात्री ८ वाजून ०५ पर्यंत

ज्येष्ठा गौरी पूजनाची पद्धत महाराष्ट्रात प्रत्येक गावानुसार वेगवेगळी आहे. काही घरांमध्ये तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांच्यावर गौराईचा फोटो किंवा मुखवटा लावून मग पूजन केले जाते. तर काही घरांमध्ये मातीच्या मूर्ती रूपात गौराईचे आगमन होते. काही भागांमध्ये हंड्यातून धान्य भरून त्या हंड्यांना साडी चोळी नेसवून दागदागिने घालून वर देवीचा मुखवटा लावला जातो. एकूणच निसर्गाच्या विविध रूपांमधील शक्तीचे पूजन हे गौरी पूजेचे औचित्य असते.

महाराष्ट्रात ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी गौराईचा आवडीचा नैवेद्य दाखवला जातो. काही घरांमध्ये मांसाहाराचा नैवेद्य तर काही ठिकाणी भाजी- भाकरीचा नैवेद्य सुद्धा दाखवण्याची पद्धत आहे. यादिवशी माहेरवाशिणी व घरातील बहिणी, शेजारपाजारच्या मैत्रिणी एकत्र येऊन गौरीचे जागरण करतात. यंदा पाच दिवसांच्या गणपतींसह गौरीचे ५ सप्टेंबरला विसर्जन होणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganeshotsav 2022 when is jyeshtha gauri aavahan date puja vidhi and timing svs