लंडन : फुप्फुस, स्तन, गर्भाशय आणि रक्ताच्या कर्करोगाबद्दल अनेकांना माहीत आहे. मात्र कोलोरेक्टल हाही कर्करोगाचा एक प्रकार असून याबाबत लोकांमध्ये पुरेशी जागरूकता नाही. या कर्करोगाला मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग असेही म्हणातात. अन्य कर्करोगाप्रमाणे हाही अतिशय जीवघेणा ठरू शकतो. जर तुमच्या आहारात लसणाचा समावेश असेल तर कोलोरेक्टल कर्करोगाचा (सीआरसी)धोका कमी होऊ शकतो, असा निष्कर्ष इटलीतील संशोधकांनी काढला आहे. ‘युरोपियन जर्नल ऑफ न्युट्रिशन’मध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील अभ्यासात संशोधकांनी लसणाचे सेवन आणि सीआरसी होण्याचा धोका यांच्यातील संभाव्य दुवा तपासला.
लसणात अनेक अपचनीय कबरेदके, पॉलिफेनॉल आणि ऑर्गोसल्फर संयुगे असतात, ज्यापैकी अनेक सीआरसीच्या कमी जोखमीशी जोडलेले आहेत. आतडय़ासंबंधी श्लेष्मल त्वचेच्या संरक्षणासाठी लसूण उपयुक्त आहे. लसणाच्या अँटिऑक्सिडेंट, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्मामुळे तो कोलोरेक्टल कर्करोग होण्यापासून रोखू शकतो.
२०१७ ते २०१९ दरम्यान इटलीच्या मिलानमधील महानगर प्रदेशात असलेल्या दोन विद्यापीठ रुग्णालयांमध्ये आयोजित केलेल्या कर्करोग नियंत्रण अभ्यासातून डेटा प्राप्त झाला. अभ्यासात सहभागींना भरती करण्यात आले जे एकतर आंतररुग्ण किंवा कोलोनोस्कोपीसाठीचे बाह्यरुग्ण होते. यामध्ये ३०० रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. या रुग्णांच्या आहारात अभ्यास करण्यात आला. ज्या रुग्णांनी कालांतराने लसणाचा वापर आहारात केला, त्यांनी सीआरसीवर नियंत्रण मिळविल्याचे दिसून आले.