Perfect Omelet Hack Video: व्हेजिटेरियन, नॉन- व्हेजिटेरियन मंडळींप्रमाणे ‘एगिटेरियन’ हा प्रकार सुद्धा तुम्ही ऐकून असाल. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सोपं उत्तर सांगायचं तर, अशी मंडळी जी शाकाहारी आहेत पण शुद्ध शाकाहारी नाही, त्यांना अंडी खाल्लेली चालतात. खरंतर याची काही अधिकृत परिभाषा नाही पण लोकांच्या आवडीनिवडीतून हा ट्रेंडी शब्द वापरला जातो. बटाट्याप्रमाणे अंड्यांच्या सुद्धा अनेक प्रकारच्या रेसिपी बनवल्या जातात पण सगळ्यांची आवडती आणि विशेषतः अगदी पाच मिनिटात करून होणारी रेसिपी म्हणजे ऑम्लेट. भारतीय कांदा टोमॅटो मसाला घातलेला अंड्याचा पोळा, इंग्लिश ब्रेकफास्टमधील अंड्याच्या पांढऱ्या भागाचं ऑम्लेट, किंवा सनी साईड अप असं हाफ फ्राय हे झटपट पदार्थ साध्या जेवणाची रंगत वाढवतात. आज हेच हाफ फ्राय, ऑम्लेट बनवण्यासाठी आपण एक जुगाड पाहणार आहोत.
@masteringhacks या इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की साधारणतः जेव्हा आपण ऑम्लेट किंवा हाफ फ्राय साठी अंडं तव्यावर फोडतो तेव्हा ते तव्याच्या सपाट आकारामुळे कडेला वाहत जातं. गॅसची आच ही मुख्यतः मधल्या भागात जास्त असणार असल्याने कडेला अंडं शिजायला किंवा तो हवा तसा कुरकुरीतपणा येत नाही. अशावेळी व्हायरल होणाऱ्या हॅकनुसार, तुम्हाला फक्त लसणाची एक पाकळी तव्याच्या मध्यभागी फिरवायची आहे. गोलाकार दिशेने ही लसूण फिरवा आणि मग अंडं फोडून तव्यावर टाका. यामुळे अंडं वाहून जात नाही आणि चटकन शिजलेलं क्रिस्प हाफ फ्राय तयार करता येईल.
ऑम्लेटला येईल परफेक्ट क्रिस्प, पाहा Video
शिवाय तुम्ही तवा सुद्धा थोडा खोलगट किंवा निदान सपाट असेल असे पाहावे वरच्या बाजूला उभट असलेल्या तव्यावरून अंडं वाहून जाण्याची शक्यता असते. शिवाय इतकं करूनही जर अंडं फोडल्यावर वाहूनच जात असेल तर कदाचित हे अंडंच फार जुनं असू शकतं. तुम्हाला ही टीप कशी वाटतेय हे कमेंट करून नक्की कळवा.