How To Use Garlic In 6 Ways To Reduce Cholesterol: आम्हाला बाबा हेल्दीच खायचं आहे पण चवीमध्ये तडजोड नको, तुमची पण अशीच इच्छा आहे का? बस तुमची इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजा कारण आज आम्ही आपल्याला अशा एक पदार्थाविषयी सांगणार आहोत जो तुम्हाला शरीराची काळजी घेताना जिभेचे चोचले पुरवण्याची सुद्धा चांगली संधी देईल. ही वस्तू म्हणजे लसूण. कुरकुरीत तळलेला लसूण साध्या वरणाला, आमटीला ‘दाल तडका’चा फ्लेव्हर देऊ शकतो. तर बटरमध्ये, हर्ब्समध्ये मिसळून लसूण ब्रेडवर लावल्याने घरच्याघरी गार्लिक ब्रेडची लज्जत चाखता येते. थोडक्यात काय तर लसणाचा तडका तुमच्या रेसिपींना १० वरून १०० गुण मिळवून देण्यासाठी बेस्ट जोड ठरू शकतो. पण एवढंच नाही कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यापासून ते मधुमेह नियंत्रित करण्यापर्यंत, हा शक्तिशाली लसूण शतकानुशतके पारंपारिक उपाय म्हणून वापरला जातो.
आज आपण लसणाचे काही फायदे व तुमच्या आहारात लसणाचा कसा समावेश करावा हे जाणून घेणार आहोत. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ अन्नू प्रसाद यांच्या हवाल्याने हेल्थशॉट्सने दिलेल्या वृत्तानुसार, तुमच्या नियमित आहारात लसणाचा समावेश केल्याने खालील चार मुख्य फायदे मिळू शकतात.
हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देणे
मधुमेह नियंत्रित करणे आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण कमी करणे
रोगप्रतिकार शक्ती वाढवते
कर्करोग विरोधी गुणधर्म
जास्तीत जास्त फायद्यांसाठी दररोज लसूण कसा खावा?
रिकाम्या पोटी कच्चा लसूण
डॉ. प्रसाद यांनी हेल्थशॉट्सला सांगितल्याप्रमाणे, रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. कच्च्या लसणात आढळणारे ऍलिसिन कोलेस्टेरॉल कमी करण्याच्या आणि रक्तप्रवाहाचा घट्टपणा कमी करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाते. सकाळी एक ग्लास पाण्यात कच्च्या लसूणच्या काही पाकळ्या टाकून खाऊ शकता. खरंतर शिजल्यावर ऍलिसिन पातळ होते, त्यामुळे लसूण खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो कच्चा आणि त्यातही रिकाम्या पोटी खाल्ल्याने अधिक फायदा मिळू शकतो. मधुमेहा नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा याची मदत होऊ शकते. जर तुम्हाला लसूण खाल्ल्याने श्वासाला दुर्गंधी येण्याची चिंता असेल तर तुम्ही लसूण लिंबू, ऍपल सायडर व्हिनेगर किंवा गरम पाण्यासह खाऊ शकता.
लसणाचा चहा
लसणाचे फायदे हवे आहेत पण लसणाचा तीव्र उग्र वास सहन होत नसेल तर आपण लसणाच्या चहाचा पर्याय विचारात घेऊ शकता. लसणाचा चहा तयार करण्यासाठी, लसणाची पाकळी ठेचून एक कप पाण्यात घाला. चहा काही मिनिटे उकळवा आणि नंतर १-२ चमचे दालचिनी घाला. गॅस बंद करण्यापूर्वी मिश्रण दोन मिनिटे तसेच राहू द्या. शेवटी, एक चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. सकाळच्या चहाचा हा चवदार आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा कप तुम्हाला निरोगी ठेवू शकतो.
लसूण आणि मध
लसणाच्या पाकळ्यांचे तीन ते चार तुकडे करा त्यात मधाचे काही थेंब घाला आणि दोन मिनिटे तसेच राहू द्या. नंतर, नीट चावून खा. चव तरीही तिखट लागत असेल तर आपण त्याच्याबाबरोबर कोमट पाणी घेऊ शकता. डॉ. प्रसाद सांगतात की, आपल्याला जर वारंवार ॲसिड रिफ्लक्स आणि अपचनाचा त्रास होत असेल तर याची लक्षणे दूर करण्यासाठी दररोज रिकाम्या पोटी एक चमचा लसूण व मधाचे मिश्रण खाऊ शकता.
भाजलेले लसूण
लसूण भाजल्याने त्याचे आरोग्य फायदे टिकवून ठेवत त्याला एक किंचित गोड चव आणता येते. लसूण भाजण्यासाठी, आपण तव्यावर सुद्धा थोडं ऑलिव्ह ऑइल लावून लसूण भाजू शकता किंवा ओव्हनमध्ये 400°F (200°C) वर लसूण मऊ आणि सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. थंड झाल्यावर, तुम्ही लसणाचा मऊ गर काढून घेऊ शकता. ब्रेडवर किंवा डिप्स आणि सॉसमध्ये मिसळून तुम्ही हा लसूण खाऊ शकता.
रोजच्या स्वयंपाकात लसूण वापरा
आपल्या दैनंदिन आहारात लसूण जोडण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तो आपल्या नियमित जेवणात समाविष्ट करणे. भाज्या, आमट्या, डाळ, सूप किंवा शक्य होईल त्या सगळ्या फोडण्यांमध्ये लसूण वापरू शकता. लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्या किंवा ठेचून घ्या आणि इतर पदार्थ घालण्यापूर्वी त्या थोड्या तेलात परतून घ्या जेणेकरून तुमच्या डिशला छान चव येईल.
हे ही वाचा<< एक महिना दुध, दही, चीज, बटर खाणं बंद केल्यास शरीरात काय बदल होतील? वजनापासून ते आजारांपर्यंत परिणाम वाचा
लसणाचं तेल
स्वयंपाक, सॅलड ड्रेसिंगमध्ये, भाज्या किंवा ब्रेड भाजून खाताना लसणाचे तेल वापरता येऊ शकते. लसणाचे तेल बनवण्यासाठी, लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या आणि कुस्करून घ्या, नंतर एका पॅनमध्ये एक वाटी स्वयंपाकाचे तेल, जसे की ऑलिव्ह ऑइल किंवा एवोकॅडो तेल घालून मंद आचेवर लसूण १० मिनिटे गरम करा, लसूण करपणार नाही याची काळजी घ्या. लसणाचे तुकडे काढण्यासाठी तेल गाळून घ्या आणि मग तेल स्वच्छ, हवाबंद बाटलीत ठेवा लसूण तेल फ्रीजमध्ये दोन आठवडे साठवा आणि मग जेवणात वापरा.
तुमच्या नियमित जेवणात लसणाचा समावेश करून, तुम्ही तुमच्या पदार्थांची चव, सुगंध सुद्धा वाढवू शकता.