वजन घटविण्याच्या शस्त्रक्रियेमुळे हाडांचे वस्तुमान आणि त्यांच्या मजबुतीवर परिणाम होत असून हाड तुटण्याचा धोका असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. जेबीएमआर प्लस या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या समीक्षेनुसार शस्त्रक्रियेनंतर हाडांमध्ये बदल होतात आणि ही प्रक्रिया वजन संतुलित झाल्यानंतरही सुरूच राहते. हाडाच्या आरोग्याबाबत सद्य:स्थितीत वैद्यकीय मार्गदर्शके दिली जातात. परंतु यातील बहुतांश सल्ले हे निकृष्ट दर्जाचे पुरावे किंवा तज्ज्ञांच्या मतांवर अवलंबून असल्याचे अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अॅन स्चॅफर यांनी सांगितले. पौष्टिक घटक, संप्रेरके, शरीर रचनेतील बदल आणि अस्थि मज्जेतील मेदामुळे हाडांचे आरोग्य खालावते. वजन घटविण्यासाठी काही काळांपूर्वी प्रचलित असलेल्या गस्ट्रीक शस्त्रक्रियेमुळे शरीरावर होणाऱ्या परिणामाचे परीक्षण करण्यात आले आहे. सध्या या शस्त्रक्रियेची जागा स्लीव्ह गॅसरेक्टमीने या शस्त्रक्रियेने घेतली आहे.
ही शस्त्रक्रिया नवीन असल्यामुळे या शस्त्रक्रियेमुळे हाडांवर काय परिणाम होतात हे अद्याप अस्पष्ट असल्याचे संशोधकांनी सांगितले. वजन घटविण्याच्या शस्त्रक्रियेमुळे हाडांवर होणाऱ्या परिणामांबाबात प्राधान्याने वैद्यकीय निर्देश देण्याचे या समीक्षणामध्ये सूचित करण्यात आले आहे. या शस्त्रक्रियांमुळे होणारे हाडांवरील दीर्घकालीन परिणाम टाळण्यासाठी अधिक अभ्यासाची आवश्यकता असल्याचे स्चॅफर यांनी सांगितले.