बदलत्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह या सारख्या आजारांच्या समस्यां अनेक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्भवताना दिसत आहेत. शिवाय लहान वयातच अनेक लोक या आजारांना बळी पडू लागले आहेत. मधुमेह हा अत्यंत धोकादायक आजार असल्याचं मानलं जाते. या आजारात रक्तातील साखरेची पातळी सतत कमी झाल्यास किंवा वाढत राहिल्यास तो अनेक मोठ्या समस्यांचे कारण बनू शकतो. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणाऱ्या लोकांना रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात ठेवणे खूप आवश्यक असते.
मधुमेहाचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी आज आम्ही काही सोपे आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही रक्तातील साखर नियंत्रणात ठेवू शकता. रात्री झोपण्यापूर्वी करण्याचे असे काही ४ उपाय आहेत, जे साखरेच्या रुग्णांसाठी खूप प्रभावी ठरू शकतात. पोषणतज्ञ लवनीत बत्रा यांनी आपल्या इंस्टाग्रामवर या संबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी चार उपाय करण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येऊ शकतात.
हेही वाचा- मानेवरील अतिरिक्त चरबी कमी करायचीय? मग घराबसल्या करा ‘ही’ ५ योगासने आणि पाहा फरक
पोषणतज्ञ बत्रा यांनी आपल्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये स्पष्ट केलं की, निरोगी साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगली झोप खूप महत्वाची आहे. अशा परिस्थितीत, या चार पद्धतींचा नियमितपणे समावेश केल्यास रक्तातील साखरेचे कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत होऊ शकते.
- कॅमोमाइल चहा –
रात्री झोपण्यापूर्वी एक कप कॅमोमाइल चहा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. हा चहा स्ट्रांग एस्ट्रिनजेंट म्हणून ओळखला जातो. यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म देखील आहेत, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.
- पाण्यात भिजवलेले बदाम –
बदामामध्ये भरपूर पोषकतत्व असतात. रात्री झोपण्यापूर्वी ७ भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर ठरू शकते. बदामामध्ये मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅन असते ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. शिवाय झोपताना बदाम खाल्ल्याने रात्री साखरेची तल्लफ जाणवत नाही आणि रात्री भूकही लागत नाही.
हेही वाचा- ब्रेडच्या पॅकेटमधील पहिला आणि शेवटचा ब्रेड खायचा की फेकून द्यायचा? नेमकं काय करायचं जाणून घ्या
- मेथीचे दाणे –
मेथीचे औषधी गुणधर्म आपल्या सर्वांना माहित आहेतच. मेथीच्या दाण्यांमध्ये उत्कृष्ट हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात जे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी भिजवलेले मेथीच्या दाण्याचे सेवन केल्यास ते आपल्या साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.
- वज्रासन –
भारतीय संस्कृतीत निरोगी राहण्यासाठी योगासनाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. रात्री झोपण्यापूर्वी १५ मिनिटे वज्रासन केले तर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते. झोपण्यापूर्वी वज्रासन केल्याने रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि रक्ताभिसरणही सुधारते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)