अचानक उचकी लागते आणि मग ती थांबवायची कशी असा प्रश्न पडतो. पहिला उपाय केला जातो तो पाणी पिण्याचा मात्र काहीवेळेस पाणी प्यायल्यानंतरही उचकी थांबत नाही. अशावेळी काय करावे असा प्रश्न पडतो. प्रत्येक वेळेस पाणी पिणे हाच उचकीवरील उपाय नसू शकतो कारण उचकी येण्याची अनेक कारणे असतात. अगदीच सांगायचं झालं तर सतत उचकी येणे हा एक प्रकारचा आजारच आहे. तसं उचकी येणे सामान्य गोष्ट आहे, ती कधीही येऊ शकते. उचकी लागल्यावर ती थांबेपर्यंत अस्वस्थ व्हायला होतं. वर नमूद केल्याप्रमाणे कधीकधी नुसत्या पाण्याने उचकी रोखणे खूप अवघड होऊ जाते. जाणून घ्या उचकी थांबवण्याचे आणखीन काही उपाय…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्वास रोखून ठेवा:
उचकी लागल्यावर एक लांब श्वास घ्यावा आणि काही सेकंद रोखून ठेवावा. असे केल्याने फुफ्फुसात हवा भरुन राहते आणि उचकी आपोआप थांबते.

सावकाश जेवा:
अनेकवेळा वेगाने जेवताना उचकी लागते. त्यामुळे मध्येच पाणी प्यावे लागते आणि पूर्ण जेवण होण्याआधीच पोट भरते. म्हणूनच जेवताना हळूहळू आणि सावकाश एक एक घास चावत जेवावे. घाईघाईत जेवल्याने तसेच जेवणात अचानक तिखट पदार्थ आल्यास उचकी लागू शकते.

साखर खाणे: 
उचकी आल्यावर लगेच एक चमचा साखर खावी. साखर खाल्यामुळे थोड्यावेळात उचकी थांबते. त्याशिवाय साखर आणि थोडं मीठ पाण्यात टाकून ते थोड्या थोड्या वेळाने प्यायल्यास उचकी थोड्यावेळात बंद होते.

मीठ आणि मिठाचे पाणी:
एक चमचा मीठ तोंडात ठेवावे. इतक्या मोठ्या प्रमाणात मीठाची चव घेतल्यास उचकी थांबते. हे शक्य नसल्यास थोडे मीठाचे पाणी घोट घोट करुन प्यावे. असे केल्यास उचकी त्वरीत बंद होते.

घाबरवणे किंवा उलटे अंक मोजा:
१०० ते १ असे उलटे अंक मोजल्याने उचकी थांबते. यामागे काही वैज्ञानिक कारण नसले तरी अनेकांचा असा अनूभव आहे. त्याचप्रमाणे अचानक उचकी लागलेल्या व्यक्तीला घाबरविल्यास उचकी थांबते.

लिंबू आणि मध: 
उचकी आल्यावर एका चमचा लिंबाचा ताजा रस आणि एक चमचा मध एकत्र करुन त्याचे चाटण तयार करा. हे चाटण घेतल्यानंतर काही वेळात उचकी बंद होते. किंवा अगदी लिंबाची खाप चावली तरी चालेल.

काळे मिरे: 
तीन ते चार काळे मिरे आणि खडीसाखर तोंडात ठेऊन चावावेत. त्यावर एक ते दोन घोट पाणी प्यायल्यास उचक्या थांबतात.

पीनट बटर किंवा टॉमॅटो: 
उचकी लागल्यास पीनट, बटर खावे किंवा टॉमॅटो खालल्यास उचकी थांबू शकते. टॉमॅटो खाताना ते दातांनी न चावता सावकाश खावे त्यामुळे श्वास घेण्याची गती बदलते आणि उचकी बंद होण्यास मदत होते.

चॉकलेट पावडर: 
उचकी लागल्यास एक चमचा चॉकलेट पावडर खावी. चॉकलेट पावडर खाल्ल्याने काही वेळात उचकी बंद होते.

एकंदरीत सांगायचे झाले तर विशिष्ट चवीचा पदार्थ जास्त प्रमाणात खालल्यास किंवा श्वासांची समान्य गती बदलल्यास उचकीवर नियंत्रण मिळवता येते. उचकी थांबवण्यासाठी वरील अनेक पादार्थ खाताना ते काही सेकंदांसाठी तोंडामध्ये ठेवावेत आणि मग गिळावेत. अचानक एखाद्या विशिष्ट पदार्थाची चव घेतल्याने शरीरातील स्थायू रिफ्रेश झाल्याप्रमाणे नव्याने काम करण्यास सुरुवात करतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Get rid of hiccups with this 9 quick tricks