उन्हाळा सुरु झाला की एक-एक करत या दिवसांमध्ये उद्भवणारे आजारही डोकं वर काढू लागतात. यामध्ये आम्लपित्त, डोकेदुखी, सर्दी, ताप आणि नाकातून रक्त येणे हे आजार हमखास होतात. वातावरणातील उष्णतेमुळे नाकातून रक्त येते. मात्र नाकातून रक्त आल्यानंतर अनेक जण गैरसमज करुन घेतात. मात्र नाकातून रक्त येण्यामागे खरे कारण काय आहे हे कोणीही समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. चला तर जाणून घेऊयात नाकातून रक्त येण्यामागील कारणं आणि त्यावरील उपाय.
नाकातून रक्त येतं म्हणजे नेमकं काय होतं?
नाकाच्या आतल्या बाजूला एक विशिष्ट प्रकारची कातडी असते. या पातळ त्वचेला ‘म्युकोझा असं म्हणतात. म्युकोझा मुळातच नरम असल्यामुळे त्याला थोडासा धक्का लागला किंवा जखम झाली तरी लगेच त्यातून रक्त यायला सुरूवात होऊ शकते. आपलं नाक नेहमी थोडं ओलसर राहावं यासाठी नाकात निसर्गत:च पातळ पदार्थ बनण्याची व्यवस्था असते. उन्हाळ्यात मात्र नाकातला ओलसरपणा कमी होऊन नाक आतून कोरडं पडतं. नाकाच्या आतल्या त्वचेला अगदी लागून रक्तवाहिन्या पसरलेल्या असतात. त्यामुळे ही त्वचा कोरडी झालेली असताना चुकून नाक- तोंड कुठे आपटलं गेलं किंवा कुणाला नाकात बोट घालून नाक कोरण्याची सवय असेल तर त्यामुळेही रक्तवाहिनी फुटते आणि नाकातून रक्त येतं.
नाकातून रक्त आल्यानंतर करावयाचे उपाय –
१. नाकातून रक्त आल्यानंतर संबंधित व्यक्तीचं डोकं थोड्याशा उंचवट्यावर ठेवावे.
२. १५ ते २० ग्रॅम गुलकंदाचं सकाळ-संध्याकाळ दूधासोबत सेवण करावं.
३. नाकातून रक्त आल्यानंतर डोक्यावर थंड पाण्याचा शिडकावा करावा किंवा बर्फाचे तुकडे एका रुमालात बांधून ते नाकावर ठेवावेत.
४. बेलाची पानं पाण्यात उकळून त्यात बत्तासे घालून ते पाणी प्यावे.
उन्हात जाण्यापूर्वी या गोष्टी आवर्जुन करा
१.थोडा ओलसर केलेला रुमाल बाहेर जाताना नाकावर बांधावा. यामुळे थेट गरम हवा नाकात जाणार नाही.
२. नाकात मारण्यासाठीचा सलाईनचा स्प्रे औषध दुकानांमध्ये सहज मिळतो. उन्हातला लांबचा प्रवास करताना काही अंतर गेल्यानंतर नाकात हा स्प्रे मारला तर नाकातला ओलसरपणा टिकून राहतो आणि त्यातून रक्त येणं टाळता येतं.
३. विशेषत: उन्हाळ्यात नाक कोरणं टाळावंच.