दिवालीचे दिवस जवळ आले आहेत. दिवाळी म्हटली की तूपातले विविध पदार्थ समोर येतात. तूपाला अनन्यसाधारण महत्व दिले जाते. या तुपापासून बनवलेल्या पदार्थात विजातीय घटक तयार होत नाहीत. त्यामुळेच ते आरोग्यवर्धक समजले जाते. लोणी कढवून त्यातील पाण्याचा अंश पूर्णत: काढून टाकल्यावर उरलेला सारभूत पदार्थ म्हणजे साजूक तूप. भारतात साजूक तुपाला आहारामध्ये ‘राजेशाही’ स्थान आहे. साजूक तुपात १०० टक्के फॅट्स आणि ९०० कॅलरीज आहेत. एक चमचा तुपात १३ ग्रॅम फॅट्स, आणि ११७ कॅलरीज असतात. सर्वसाधारणपणे रोज दोन लहान चमचे किंवा पळीभर साजूक तूप मोठयांच्या आहारात सुचवले जाते. बहुतेक जेवताना वरणावर साजूक तूप घालून खाणे पसंत करतात.
साजूक तूप हे संपृक्त चरबीयुक्त असले तरी त्यात आरोग्यदायी घटक असल्याचे संशोधन करण्यात आले आहे. त्यामुळे हल्ली साजूक तुपाचा, तोही गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचा वापर आहारात केला जातो. त्यातील काही आरोग्यदायी घटक निदर्शनास आले आहेत.
गाईच्या तुपात म्हशीच्या तुपापेक्षा अधिक ‘अ’ जीवनसत्त्व आहे. साजूक तुपामध्ये रेटिनॉल व बेटाकेरोटीन हे घटक आहेत. हे पौष्टिक घटक डोळयांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जातात. २०१० मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार साजूक तूप हे रक्तातील सर्वात वाईट कोलेस्टेरॉल कमी करते. तसेच, चांगले कोलेस्टेरॉल वाढवते. बाजारात मिळणारे वनस्पती तूप (डालडा) हे मात्र बरोबर याच्या उलट काम करते. साजूक तूपात कोलेस्टेरॉल आहे, परंतु ते शरीरात गेल्यावर परावर्तित होत नाही. त्यामुळे ते घातक नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी तूपाचे जास्त सेवन करू नये.

Story img Loader