Ghee on Chapati Benefits: तूप हा भारतीय घरांमध्ये आढळणारा एक कॉमन पदार्थ आहे. महागाई वाढली तरी प्रत्येक घरात लहानसा का होईना तुपाचा डबा असतोच. काहीजण तर अगदी दुधाची साय साठवून मग एकदाच घरच्या घरी त्याचे साजूक तूप तयार करून ठेवतात. तुपाचा वापर कसा करायचा हे तुम्हाला तूप किती आवडते यावरच अवलंबून आहे पण काही जणांना तूप खाल्ल्याने त्यातील कॅलरीजमुळे वजन वाढेल अशीही चिंता सतावत असते. म्हणून अगदीच क्वचित कधीतरी गोडाचा पदार्थ बनवल्यावर त्यात तूप वापरले जाते. पण तुम्हाला माहित आहे का, अगदी रोजच्या रोज एक चमचा तूप लावलेल्या पोळ्या खाल्ल्याने सुद्धा तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. पोळीवर तूप लावून खाण्याचे काही फायदे आज आपण पाहणार आहोत.
पोळीवर तूप लावण्याचे फायदे
१) जरी चुकून तुमच्याकडून पोळी शेकताना कडक झाली असेल किंवा पीठच जास्त घट्ट झाल्याने पोळी काहीशी रुक्ष असेल तर तुपामुळे त्याला मऊपणा येऊ शकतो.
२) तुपामुळे पोळीला एक विशिष्ट प्रकारचा गंध व चव मिळते, तसेच पोळीचा पोत सुद्धा सुधारण्यास मदत होते.
३) पोळीमध्ये (गव्हाच्या) असणाऱ्या फायबरला तुपाची जोड मिळाल्याने पचनप्रक्रियेला हातभार लागतो.
४) तुपातील हेल्दी फॅट्स तसेच जीवनसत्व यामुळे शरीराला वाढीसाठी आवश्यक असे फॅटी ऍसिड व हार्मोन्स प्राप्त होतात. यामुळे मेंदूचा विकास होण्यास मदत होते.
५) तुपामुळे पाचक एन्झाइम्स आतड्यांमध्ये सोडले जातात ज्यामुळे बद्धकोष्ठतेसारखे त्रास दूर होण्यास मदत होते.
६) जेव्हा तुम्ही भात किंवा पोळीबरोबर तुपाचे सेवन करता तेव्हा मूळ आहारातील पोषकसत्व शरीरात अधिक उत्तमरीत्या शोषून घेण्यास मदत होते.
७) तुपातील अँटिऑक्सिडंट्स हे अनेक रॅडिकल्सवर मात करण्याचे काम करतात त्यामुळे त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्याची शक्यता कमी होते.
हे ही वाचा<< रात्री झोपताना बेंबीत तुपाचे काही थेंब घालण्याचे ६ आश्चर्यकारक फायदे; स्त्री- पुरुष दोघांनाही कामी येईल
दरम्यान, अनेकदा पोळीबरोबर किंवा शिरा- मोदक अशा गोड पदार्थांमध्ये तुपाचा वापर करताना त्याला जोडीने भरपूर साखर वापरली जाते. यामुळे तुपाचे पोषक सत्व हे साखरेतील घातक घटकांमुळे मारले जाते. त्याऐवजी समजा जर तुम्ही तूप पोळी आणि साखर खात असाल तर साखरेला पर्याय शोधणे आवश्यक आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे यास वैद्यकीय सल्ला समजू नये)