नवी दिल्ली : भारतात कर्करोगग्रस्त मुलींपेक्षा या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांना उपचाराच्या अधिक संधी मिळतात, असे ‘द लॅन्सेट ऑन्कोलॉजी’मध्ये प्रकाशित एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामागे लैंगिक भेदभाव हे कारण असण्याची शक्यताही वर्तविण्यात आली.
१ जानेवारी २००५ पासून ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतची भारतातील तीन कर्करोगसंबंधी रुग्णालयांतील आकडय़ांच्या आधारे १९ वर्षांपर्यंतच्या कर्करुग्ण मुलांची माहिती अभ्यासगटाने गोळा केली. यामध्ये कर्करोगग्रस्त मुलींपेक्षा किती मुलांवर उपचार करण्यात आले, यासंबंधी माहिती आहे.
एम्स-नवी दिल्लीच्या कर्करोग निदान विभागाचे प्राध्यापक समीर बक्शी यांनी सांगितले की, सुमारे ११ हजार रुग्णांमधील मुलींपेक्षा अधिक मुलांवर उपचार करण्यात येत आहेत, असे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले. लैंगिक भेदभाव हे यामागे प्रमुख कारण असू शकते, असेही त्यांनी सांगितले. कर्करोगाची लक्षणे दिसल्यानंतर अनेक मुली तपासणी आणि उपचारासाठी पुढे येत नाहीत, त्यामुळे कर्करुग्ण मुलींची माहिती मिळत नाही. सामाजिक मानसिकतेमुळे असे प्रकार घडतात, असेही त्यांनी सांगितले. उपचारासाठी येणारा मोठा खर्च हा प्रमुख मुद्दाही आहे, असे संशोधकांना आढळले.