करोनामुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला खूप मोठा काळ घरातच घालवावा लागला. काही प्रमाणात नियमांमध्ये शिथिलता आलेली असली तरीही अनेक जण सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत. या निमित्ताने आपल्या कुटुंबियांसोबत बराच वेळ घालवण्याची संधी प्रत्येकाला मिळाली. पण ह्या काळात स्वतः साठीची स्पेस मिळवणं, आपली ब्रीदिंग स्पेस मिळवण्याची गरजही तितकीच वाढली. आता हा स्वतःचा वेळ मिळवण्यासाठी घरातल्या बाल्कनी इतकी बेस्ट जागा कोणती? नाही का. तर तुमची ही स्पेशल जागा आणखी स्पेशल बनवण्यासाठी काय करता येईल? यासाठी काही अत्यंत आकर्षक आणि क्रिएटिव्ह कल्पना पाहुयात ज्यानं तुमच्या बाल्कनीचं रूपच पालटेल. आकर्षक रंगांचा वापर, योग्य लायटिंग आणि लहानसं फर्निचर या सगळ्याच्या एकत्रित वापराने निश्चितच तुमची बाल्कनी हा घरातला अत्यंत सुंदर भाग बनेल.
लहानसं पण आकर्षक फर्निचर
तुमच्या बाल्कनीमध्ये लहानश्या पण अत्यंत आकर्षक आणि आरामदायी फर्निचरचा वापर जरूर करा. फोल्डेबल फर्निचर हा देखील एक उत्तम पर्याय आहे. बाल्कनीमध्ये एक छोटीसी सीटिंग अरेंजमेंट अतिशय उपयुक्त आहे. जेणेकरून घरातल्या गडबडीतून बाजूला येऊन स्वतःची शांतता मिळवण्यासाठी आणि बराच वेळ अगदी आरामात, आनंदाने घालवण्यातही ही उत्तम जागा ठरेल. अनेक जण बाल्कनीच्या फरशीवरच एखादी गादी आणि उशांसह सीटिंग अरेंजमेंट करतात. त्याचसोबत मॉडर्न स्टाईलचे लहानसे बाक, कॅफे टेबल्स, आरामदायी खुर्च्या, लहानसा झोपाळा यांसह अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ह्यामुळे तुम्ही बाल्कनीत अगदी कितीही वेळ आनंदाने घालवू शकता.
आकर्षक रंगांचा वापर
आपल्या बाल्कनीत भरपूर रंगांचा वापर करा. बाल्कनीच्या भिंतींचा मूळ रंग संपूर्ण पांढरा करा. मात्र त्यातलं बरंचसं सामान, वस्तू बहुरंगी असू द्या. विविध रंगांची फुलझाडं, रंगीबेरंगी कुंड्या, मेटल शो पीस, आदिवासींच्या पारंपरिक हस्तकला, चित्रकला यांसारख्या काही वस्तूंचा वापर करा. ह्यासाठी आणखी अनेक पर्याय ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत. आकर्षक रंगांच्या वापराने तुमची बाल्कनी अगदी फ्रेश दिसेल.
योग्य लाइटिंग
आकर्षक रंगांच्या वापरासह आणखी एक गोष्ट तुमच्या बाल्कनीला उठावदार करू शकते ती म्हणजे लाइटिंग. बाल्कनी लाइटिंगचे प्रकारही खूप आहेत. उदा. फेअरी स्ट्रिंग लायटिंग, स्पेशल बाल्कनी लँटर्न्स, बाल्कनी बल्ब्स, वॉटरप्रूफ सोलर लाईट्स, कॅफे ट्रिंग लाईट्स, कलर चेंजिंग लाईट्स, कर्टन लाईट्स इ. अनेक पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत जे तुमच्या बाल्कनीला फार सुंदर लूक देऊ शकतात.
छोटंसं गार्डन
बाल्कनी म्हणजे भरपूर हिरवीगार रोपं आलीच. या रोपांच्या कुंड्या सजवण्यासाठी देखील काही चांगले पर्याय आहेत. हँगिंग प्लांट्स हा त्याचपैकी एक पर्याय. तुम्ही इथं फुलझाडांसह काही औषधी झाडं देखील लावू शकता. अनेक जण या हिरव्यागार रोपट्यांच्या मधोमध आपल्या बाल्कनीची सीटिंग अरेंजमेंट ठेवतात.
तर या काही टिप्स तुमची बाल्कनी जरूर सजवून पहा. सकाळी प्रसन्न वातावरणात, दुपारी जेवणानंतर, संध्याकाळी चहाच्या निवांत वेळी आणि रात्रीच्या चांदण्यांत तुमच्या या स्पेशल जागी येऊन निवांत बसण्यात खरंच किती सुख असेल याची कल्पना करा.