बाळाच्या वाढीसाठी पोषक अन्न आणि द्रवपदार्थ देणं महत्वाचं आहे. त्यामुळे ६-१२ महिन्याच्या कालावधीनंतर बाळासाठी आईचं दूध पुरेसं नसतं. सहा ते बारा महिन्यानंतर बाळाची भूक वाढत जाते. त्यामुळे स्तनपान केलं तरी बाळाची भूक भागत नाही. त्यामुळे बाळाच्या आहारात हळू हळू घन पदार्थांचा समावेश करावा. जेव्हा बाळ पावलं टाकायला सुरूवात करतं, तेव्हा त्यांना अन्न पदार्थांविषयी उत्सुकता असते म्हणून त्याआधीच बाळांना अन्न पदार्थांची ओळख करून दिली पाहिजे. बाळ जेव्हा ६-१२ महिन्याचे होतात तेव्हा बाळांच्या शरीरात घनपदार्थांना पचवण्याची क्षमता तयार होते. सहा महिन्यानंतर स्तनपानासह बाळाला पूरक अन्न म्हणून वरण-भात, खिचडी, भाज्या घालून केलेली खिचडी, भरड किंवा आंबिल आणि फळे कुस्करून द्यावीत. बाळाला सुरूवातीचे काही दिवस आहार हा पातळ नसून थोडेसे घट्ट असावा. एखादे पातळ पदार्थ हा अंगावरील दुधापेक्षा घट्ट असावा. जर बाळाला तुम्ही पातळ पदार्थ दिले तर बाळाचे पोट भरणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात बाळाचा आहार कसा असावा…

१. तांदळाची पेज

६ ते १२ महिन्याचे बाळ सशक्त आहार घेण्यासाठी तयार असते. बाळाच्या आहाराची सुरूवात करताना सगळ्यात आधी तांदळाची पेज द्यावी. तांदळाची पेज ही बाळसाठी पोषक व पूरक अन्न आहे.

२. फळांचा रस

फळांचा रस बाळाच्या आहारात महत्वाचा घटक ठरतो. फळांमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि असे बरेच घटक असतात. त्यामुळे दररोज वेगवेगळ्या फळांचा रस बाळाला द्यावा. सफरचंद हे इतर फळांमध्ये सर्वाेत्कृष्ट फळ असल्यानं बाळाच्या आहारात सफरचंदाच्या रसाचाही समावेश करावा. हळूहळू डॉक्टरांच्या सल्ल्याने इतर फळांचा रस देण्यास सुरुवात करावी.

३. भाज्यांची प्यूरी

भाज्यांमध्ये आवश्यक असलेले बहु-जीवनसत्त्व आणि खनिजं असतात. भाज्या वाफवून आणि उकडून त्यांची प्यूरी बनवून बाळाला देऊ शकता. तसेच उकडलेले भाज्यांचे तुकडे देखील १० ते १२ महिनाच्या बाळाला देऊ शकता. कारण या महिन्यात बाळाचे दात हे पूर्णपणे आले नसले, तरी त्यांच्या हिरड्या कडक बनलेल्या असतात.

४. लापशी

विविध धान्यांपासून बनवलेली लापशी बाळाच्या शरीरासाठी पोषक आणि पूरक अन्न असते. बाळाला तांदूळ, गहू, ओट्स, जव, बाजारी, नाचणी, यासारख्या धान्यांची पावडर करून त्याची लापशी बनवून बाळाला देऊ शकता. लापशी दिल्याने बाळाची पदार्थ पचवण्याची क्षमता अधिक वाढते आणि बाळाचं पोटही भरलेलं राहतं.

५. उकडलेल्या फळभाज्या

बाळाला अन्नपदार्थांची ओळख व्हावी म्हणून त्यांना पालक, गाजर, बीट, रताळे, लाल भोपळा आदी पुर्णपणे शिजवून मऊ करून गाळणीतून बारीक पेस्ट करून ती खायला द्यावीत. बाळाला लोहाची गरज अधिक असते, त्यामुळे या आहारातून बाळाची लोहाची गरज भरून निघते.

(टीप: या टिप्सचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमेली डॉक्टरचा अथवा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)