गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असणाऱ्या गोदरेज अँड बॉयसने नुकतेच जाहीर केले की भारतातील आघाडीचा फर्निचर ब्रँड गोदरेज इंटेरिओने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, चुकीच्या बसायच्या पद्धतीमुळे घरून अभ्यास करणाऱ्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होत आहेत.

काय सांगतो हा रिसर्च ?

रिसर्चमध्ये भारतातील ३-१५ या वयोगटातील ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्यात आला. लॉकडाऊनमुळे शाळा बंद होण्याच्या आधीच्या काळापेक्षा २ ते ३ तास जास्त म्हणजेच दिवसाला साधारण कमीत कमी ४ ते ६ तास मुलं गॅजेटवर असतात असं या संशोधनात सहभागी झालेल्या पालकांनी सांगितलं. या वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होण्याचा  धोका वाढला आहे. या अभ्यासातून हेही उघड झाले आहे की ५२% विद्यार्थ्यांचे दररोज ऑनलाईन वर्ग असतात. तर ३६% विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग आठवड्यातून ४ वेळा असतात. या ऑनलाईन वर्गांचा परिणाम मुलांच्या डोळ्यांवर होत आहे. जवळ जवळ ४१% मुलांनी डोळ्यांवर ताण येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. २२% विद्यार्थी गादीवर बसून तर १४% विद्यार्थी जमिनीवर बसून ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहतात. खूप वेळ चुकीच्या पद्धतीने अभ्यासाला बसल्यामुळे पाठीच्या मणक्यांचे आजार उद्भवू शकतात, अशी चिंता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

उपाययोजनांसाठी खास वेबिनार

गोदरेज इंटेरिओने ‘घरून शिक्षण घेण्यासाठी मुलांना मदत’ या विषयावर एका वेबिनारचे आयोजन केले होते. सर्वांगीण आरोग्याची काळजी कशी घ्यावी? त्यासाठी घरात योग्य वातावरण निर्माण करण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते? सोबतच घरातून शिकत असताना मुलांची वर्तणूक, बसण्याची योग्य पद्धत, मुक्त वातावरणात शिक्षण घेत असताना घ्यायची काळजी असे विविध मुद्दे या वेबिनारमध्ये चर्चिले गेले. वेबिनारमध्ये  मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी योग्य वातावरण तयार व्हावे म्हणून उत्तम आहाराची आणि शारीरिक व्यायामाची गरज या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला.

Story img Loader