अमेरिका, युरोपमध्ये बँकिंग क्षेत्रात संकट आलं आहे. त्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये मंदी आली आहे. अशात भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतींनी जबरदस्त उसळी घेतली आहे. सोमवारी सराफ बाजारात सोनं प्रति तोळा १४०० रूपयांनी महाग झालं आणि ६० हजार १०० प्रति तोळा एवढं पोहचलं आहे. आर्थिक संकट असताना भारतात गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं आहे. मागच्या १७ वर्षात सोन्याची किंमत सहापटीने वाढली आहे.
का वाढते आहे सोन्याची किंमत?
मार्केट एक्स्पर्ट अनुज गुप्ता यांच्या अंदाजानुसार सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळेच अमेरिका आणि इतर देशांमध्ये बँकिंग संकट, डॉलर कमकुवत होणं, सेफ हेवन डिमांड आणि शेअर बाजारांवर अनिश्चितेतचं सावट आहे. शेअर बाजारात जरी मंदी आलेली असली तरीही सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे बाजाराला आधार मिळाला आहे. आठवड्याभरापूर्वी ५५ हजार रूपये प्रति तोळा असलेलं सोनं आता ६० हजार १०० रूपये प्रति तोळा (प्रति १० ग्रॅम) इतकं झालं आहे. आज तकने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
१७ वर्षात सोन्याच्या किंमती झाल्या सहापट
सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा वाढ कशी आणि कधी झाली?
५ मे २००६
सोनं- १० हजार रूपये प्रति तोळा
६ नोव्हेंबर २०१०
सोनं २० हजार रूपये प्रति तोळा
१ जून २०१२
सोनं- ३० हजार रूपये प्रति तोळा
३ जानेवारी २०२०
सोनं ४० हजार प्रति तोळा
२२ जुलै २०२०
सोनं ५० हजार प्रति तोळा
२० मार्च २०२३
सोनं ६० हजार रूपये प्रति तोळा
मागच्या १७ वर्षांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये अशी वाढ झाली. २००६ मध्ये १० हजार रूपये प्रति तोळा असलेलं सोनं आता ६० हजार रूपये प्रति तोळाच्याही पुढे गेलं आहे. याचाच अर्थ १७ वर्षात सोनं प्रति तोळा ५० हजार रूपयांनी महागलं आहे.
सोन्याचे दर आणखीही वाढू शकतात
मार्केट एक्स्पर्ट्सच्या अंदाजानुसार येत्या काळात सोन्याच्या किंमती आणखी वाढू शकतात. सोन्याचा दर महिन्याभरात ६२ हजार रूपये प्रति तोळा इतका वाढू शकतो. मागच्या वर्षी रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर भारतात सोन्याच्या किंमतीत काही प्रमाणात घट झाली होती. मात्र दिवाळीनंतर सोन्याच्या दरांचा आलेख चढताच आहे. मार्च २०२३ मधला सोन्याचा दर रेकॉर्डब्रेक ठरला आहे.
केंद्रीय बँकांनी वाढवली सोन्याची खरेदी
अनेक केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी वाढवली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकही त्याला अपवाद नाही. जगावर मंदीचे ढग आहेत. बँकिंग क्षेत्रात संकट आलं आहे. अशात सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय अनेक जण निवडत आहेत. त्यामुळेच सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.