Good Friday 2023 : गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्माचा एक प्रमुख दिवस आहे. आज ७ एप्रिल २०२३ रोजी ‘गुड फ्रायडे’हा दिवस पाळला जाणार आहे. याचे नाव गुड फ्रायडे असले तरी ख्रिस्ती बांधव हा ‘शोक दिवस’ म्हणून पाळतात. गुड फ्रायडेची तारीख ‘ईस्टर संडे’च्या तारखेनुसार निश्चित होते. दरवर्षी ‘ईस्टर संडे’च्या तीन दिवस आधी म्हणजे शुक्रवारी ‘गुड फ्रायडे’ पाळला जातो. पण हा दिवस का पाळला जातो आणि त्यामागची नेमकी कथा काय आहे जाणून घेऊ..
‘गुड फ्रायडे’मागचा नेमका इतिहास काय?
जेरुसलेम प्रांतात भगवान येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्माचा प्रसार, प्रचार करीत होते. ख्रिस्तांच्या बोलण्याकडे अनेक लोक आकर्षित व्हायचे. येशू स्वत:ला देवाचा पुत्र मानत होते, जे तत्कालीन धर्मप्रसारकांना आवडत नव्हते. या वेळी येशूंनी आपली बाजू लोकांना पटवून सांगितली, जी काही लोकांना पटली देखील. त्यामुळे येशूंच्या किमयेने लोक त्या धर्मप्रसारकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागले.
धर्मप्रसारकांनी या गोष्टीची तक्रार रोमन गव्हर्नर पिलाता यांच्याकडे केली. तसेच येशूमुळे धर्म आणि राष्ट्रासाठी धोका असल्याचा दावा केला. या वेळी रोमन गव्हर्नर पिलाता याने प्रभू येशू ख्रिस्ताला गोलागोथानामक वधस्तंभावर लटकवले आणि त्यांच्या हाता-पायांना खिळे ठोकून त्यांना शिक्षा दिली. या शिक्षेत रोमन सैनिकांनी त्यांना खूप यातना दिल्या, असेही बायबलमध्ये सांगितले आहे. याच वेळी येशू ख्रिस्त यांचा मृत्यू झाला.
ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तांना वधस्तंभावर लटकवण्यात आले तो दिवस शुक्रवारचा होता. त्यामुळे येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ हा दिवस ‘गुड फ्रायडे’ म्हणून पाळतात. ख्रिश्चन धर्माचे अनुयायी हा दिवस ‘शोक दिवस’ म्हणून पाळतात. चर्चमध्ये जाऊन प्रभू येशूचे स्मरण केले जाते आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा घेतली जाते.
‘गुड फ्रायडे’ला होली फ्रायडे, ब्लॅक फ्रायडे किंवा ग्रेट फ्रायडे म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी काही ख्रिश्चनबांधव उपवास ठेवतात, या काळात मांस खाल्ले जात नाही, परंतु फळे, भाज्या, मासे, दूध आणि गहू यांचे सेवन नक्कीच केले जाते.
या दिवसाला ‘गुड फ्रायडे’ का म्हणतात?
अनेक जण असेही म्हणतात की, या दिवसाला मूलतः ‘गॉड’ फ्राइज म्हटले जात होते, जो कालांतराने ‘गुड फ्रायडे’ बनला. काहींचा असा विश्वास आहे की, या दिवसाचे नाव योग्य आहे, कारण येशूचे दुःख त्याच्या अनुयायांना पापापासून वाचवण्याची देवाची योजना होती.
‘गुड फ्रायडे’ कधी पाळला जातो?
‘गुड फ्रायडे’ हा दिवस एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सहाव्या दिवशी येतो. त्यानंतर ईस्टरचा सण येतो. चर्चच्या लूनर कॅलेंडरनुसार, ईस्टर हा पाश्चाल पौर्णिमेनंतरच्या पहिल्या रविवारी पाळला जातो. जो या वर्षी ५ एप्रिल रोजी आहे, म्हणजे ७ एप्रिल रोजी ‘गुड फ्रायडे’ आणि ९ एप्रिल रोजी ईस्टर पाळला जाईल.
या दिवशी मासे खाण्याला का आहे एवढे महत्त्व?
ख्रिश्चन धर्माचे लोक या दिवशी मांस खात नाहीत, पण त्याऐवजी मासे खातात. या मागचे कारण असे की, समुद्रातून मिळणारे मासे हे मांसापेक्षा (चिकन, मटण) वेगळे मानले जातात. माशांचा आकार हे ख्रिश्चन धर्मातील एक गुप्त प्रतीक मानले जाते. कारण ज्या वेळी ख्रिश्चन धर्मावर बंदी घालण्यात आली त्या वेळी ख्रिश्चन बांधवांनी एकमेकांना माशांच्या मदतीने ओळखले. यात येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवणाऱ्यांमध्येही अनेक मच्छीमार होते.
याशिवाय पूर्वीच्या काळी मांस हा खास पदार्थ मानला जात होता. त्याचदरम्यान मासे सहज उपलब्ध व्हायचे, जे बहुतेक लोक सहज खरेदीदेखील करू शकत होते. या दिवशी मासे खाण्याचे आणखी एक कारण म्हणजे मासे खाण्यास थंड असतात, पण मांस (मटण, चिकन) उष्ण असते, जे उपवास करणाऱ्या व्यक्तीसाठी चांगले मानले जात नाही, त्यामुळे ‘गुड फ्रायडे’च्या दिवशी अनेक ख्रिश्चन बांधव मांसापेक्षा मासे खाणे पसंत करतात.