घरात केळ्याचा घड आणल्यावर अनेक वेळा त्यातील काही केळी शिल्लक राहतात आणि जास्त पिकल्याने ती खाण्या योग्य राहत नाहीत. अशा पिकलेल्या केळ्यांचा तुम्ही सकाळच्या नाष्ट्यासाठी ‘बनाना ब्रेड’ बनवू शकता. येथे देण्यात आलेली रेसिपी ही १०x४ आणि ६x३ च्या ब्रेड पात्रांसाठीची आहे. छोट्या पात्रात बनविलेला ‘बनाना ब्रेड’ तुम्ही आप्तेष्टांना अथवा शेजाऱयांना देऊ शकता.
साहित्य:
३१५ ग्रॅम मैदा
१ टेबल स्पून बेकिंग सोडा
१ टेबल स्पून बेकींग पावडर
अर्धा टेबल स्पून मीठ
४० ग्रॅम ओल्या नारळाचं खवलेलं खोबरे
१०० ग्रॅम ब्राऊन शुगर
२१० ग्रॅम पिठी साखर
३ अंडी
१ टेबल स्पून व्हेनिला इसेन्स
१२५ एमएल सनफ्लॉवर तेल
३ जास्त पिकलेली केळी
५० ग्रॅम अक्रोड (बारीक तुकडे )
कृती:
प्रथम ओव्हन १८० डिग्री सेल्सियसला प्रिहीट करून घ्या. ब्रेड पात्राला थोडे तेल लावून ठेवा. केळ्याची साल काढून केळी चांगली कुस्करून घ्या. एका मोठ्या भांड्यात मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि मीठ चांगले एकत्र करून त्यात खवलेले खोबरे घालून ढवळून घ्या. तयार झालेले मिश्रण बाजूला सारून ठेवा. दुसऱ्या भांड्यात ब्राऊन शुगर, पिठी साखर, अंडी आणि व्हॅनिला इसेन्स ३ ते ४ मिनिटासाठी ब्लेण्डरने फेटून घ्या. या फेटलेल्या मिश्रणात तेल घालून चांगले ढवळा. नंतर कुस्करलेला केळ्याचा गर या बॅटरमध्ये मिक्स करा. आधी तयार केलेले मैद्याचे मिश्रण या बॅटरमध्ये चांगले एकत्र करा. हे करत असताना बॅटर हळूवारपणे ढवळत राहा. त्याचबरोबर आक्रोडाचे तुकडेदेखील या मिश्रणात घाला. तयार झालेले मिश्रण दोन्ही ब्रेड पात्रामध्ये काढून घ्या. गोल्डन ब्राऊन होऊन चांगले फुगून वर येईपर्यंत बेक करा. यासाठी जवळजवळ ४० ते ५० मिनिटाचा कालावधी लागू शकतो. ब्रेड तयार झाला आहे अथवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी घरातील टुथपिकचा वापर करू शकता. टुथपिक ब्रेडमध्ये टोचून बाहेर काढल्यावर ब्रेडचे मिश्रण टुथपिकला चिकटले नसेल म्हणजे ब्रेड तयार झाला आहे असे समजावे. तयार ‘बनाना ब्रेड’ १० मिनिटे थंड होण्यासाठी बाजूला ठेऊन नंतर सर्व्ह करा.