नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. ही सेवा गुगलने सर्वप्रथम गेल्या वर्षी अमेरिकेत सुरू केली होती. गुगल फॉर जॉब्स असं या गुगलच्या नव्या फीचरचं नाव असून याद्वारे नोकरीच्या शोधात असणा-यांचं काम सोपं व्हावं हा गुगलचा प्रयत्न आहे.
सध्या हे फीचर केवळ इंग्रजी भाषेतच उपलब्ध असणार आहे. याशिवाय काही राज्य सरकारांसोबतही गुगलची बोलणी सुरू आहेत. गुगलने अनेक कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. TimesJobs, Shine.Com आणि LinkedIn यांसारख्या अनेक संकेतस्थळांसोबतही गुगलने भागीदारी केली आहे. या फीचरद्वारे नोकरीचा शोध घेणं सहज-सोपं व्हावं हा गुगलचा प्रयत्न आहे.
कसं करायचं सर्च – गुगल सर्चमध्ये केवळ Jobs near me किंवा Jobs for fresher असे कीवर्ड्स लिहिल्यास तुमच्या समोर गुगलचा नवा डॅशबॉर्ड सुरू होईल. येथे नोक-यांची यादी दिसेल, तेथे क्लिक करुन तुम्ही नोकरीसाठी अर्ज करु शकतात. एका जॉब व्हॅकेन्सीवर क्लिक केल्यास तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील. सर्वप्रथम नोकरीबाबत माहिती असेल, त्यानंतर पात्रता किती असावी याबाबत आणि कोणत्या संकेतस्थळावर नोकरीची माहिती आहे हे दिसेल आणि तुम्ही तेथून अर्ज करु शकतात. येथे सेव्ह करण्याचा पर्यायही उपलब्ध असेल.
– तुम्ही नोकरी शोधताना प्रेफेरेंस सेट करु शकतात. म्हणजे पार्ट टाइम किंवा फुल टाइम जॉब, लोकेशन, जॉब टायटल आणि अनुभव आदी गोष्टी तुम्हाला हव्या त्याप्रमाणे सेट करता याव्यात यासाठी कंपनीने स्मार्ट फिल्टर दिलं आहे. तसंच यामध्ये अलर्ट फीचर देखील आहे , म्हणजे तुम्ही शोधत असलेल्या नोकरीसारखी एखादी संधी असेल तर तुम्हाला इमेल पाठवून माहिती दिली जाईल.