मोबाईलमधील मेमरी वाचवण्यासाठी गुगल फोटोजचा वापर करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. फोनची मेमरी कमी असणाऱ्यांना आतापर्यंत फोनवरील फोटो आणि व्हिडीओ गुगल फोटोवर मोफत सेव्ह करता यायचे. मात्र आता आठ महिन्यानंतर म्हणजेच जून २०२१ नंतर असं करता येणार नाही. यासंदर्भात गुगलने आपल्या युझर्सला अधिकृत ईमेल केला आहे. जून २०२१ नंतर गुगलच्या फोटो अॅपमध्ये जास्तीत जास्त १५ जीबीपर्यंतची स्टोरेज मेमरी मोफत उपलब्ध होणार आहे. प्रत्येक गुगल अकाऊंटसोबत १५ जीबी स्टोरेज मोफत दिला जाईल. मात्र त्यापुढे स्टोरेज हवी असल्याच गुगलच्या इतर सेवांप्रमाणेच त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या जीमेल आणि ड्राइव्हसाठी सशुल्क सेवा दिली जाते.
गुगलने दिलेल्या माहितीनुसार गुगल फोटोजमधील फोटो आणि व्हिडीओ हे जर २०२१ जून आधी सेव्ह केले असतील तर ते अनलिमीटेड स्टोरेजमध्ये ग्राह्य धरले जातील. मात्र त्यानंतर मर्यातील स्टोरेज युझर्सला दिली जाईल. म्हणजेच १ जून २०२१ नंतर गुगल युझर्सला केवळ १५ जीबीपर्यंतची फ्री स्पेस मिळणार असून त्यापेक्षा अधिक स्टोरेज स्पेस हवी असल्यास गुगलचे सबक्रिप्शन घ्यावे लागणार आहे. सध्या गुगलने गुगल फोटोसाठी कोणतीही मर्यादा ठेवलेले नाही. त्यामुळे अगदी हाय रेझोल्युशन फोटोंपासून सर्व काही अगदी मोफत गुगल फोटोजवर सेव्ह करता येतात.
Starting June 1, 2021, new photos and videos uploaded in High quality will begin counting towards your 15GB of Google Account storage.
Learn more here: https://t.co/SuS34HFjAu
— Google Photos (@googlephotos) November 11, 2020
गुगलने दिलेल्या माहितीनुसार दर आठवड्याला गुगल फोटोजवर २८ अरब फोटो अपलोड होतात. नवीन धोरण लागू केल्यानंतर तीन वर्षांमध्येच गुगलची सेवा वापरणारे 80 टक्क्यांहून अधिक युझर्स आपला गुगल फोटोजचा वापर १५ जीबीच्या आत ठेवतील असा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे. त्यामुळेच १ जून २०२१ नंतर युझर्सला आपल्याकडे महत्वाचे आणि चांगले फोटोच गुगल फोटोजमध्ये सेव्ह केले जातील यासंदर्भात विषेश काळजी घ्यावी लागेल.
कोणत्याही युझर्सने १५ जीबीच्या आसपास स्टोरेज स्पेस वापरल्यास त्याला ई-मेलवर यासंदर्भात कळवलं जाईल असं गुगलने म्हटलं आहे. एखाद्या व्यक्तीला १५ जीबीपेक्षा अधिक स्टोरेज हवी असल्यास त्याला महिन्याला १३० रुपये किंवा वर्षाला १३०० रुपये देऊन सबक्रिप्शन घेता येईल. एवढ्या रक्कमेमध्ये गुगलकडून १०० जीबी स्टोरेज स्पेस दिली जाईल.