तंत्रज्ञान आणि डिजीटल ब्रॉडकास्टींग क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्या गुगल आणि अॅमेझॉनमधील वाद पुन्हा नव्याने समोर आला आहे. गुगलने आज अॅमेझॉनच्या काही उपकरणांवरून युट्यूबची सेवा काढून घेतली आहे. अॅमेझॉनने काही दिवसांपूर्वी आपल्या साईटवरून गुगलचे प्रोडक्ट विकणे बंद केल्यानंतर गुगलनेही जशाच तसे उत्तर म्हणून हा निर्णय घेतल्याचे समजते.
आज गुगलने जारी केलेलेल्या एका पत्रकामध्ये याबद्दल माहिती दिली. अॅमेझॉनने नुकतेच लॉन्च केलेल्या स्क्रीन असणाऱ्या स्मार्ट स्पिकर्सवर यापुढे युट्यूबची सेवा वापरता येणार नसल्याचे गुगलने जाहीर केले. तसेच पुढील २५ दिवसांमध्ये अॅमेझॉनच्या फायर टीव्हीवरही युट्यूबची सेवा बंद करण्यात येणार असल्याचेही कंपनीने सांगितले. अॅमेझॉन आणि गुगल या दोन्ही कंपन्या अनेक क्षेत्रामध्ये एकमेकांचे मोठे प्रतिस्पर्धक असल्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा दोन्ही कंपन्या प्रयत्न करीत आहेत. आपले डिव्हाईस किंवा सेवा प्रतिस्पर्ध्याच्या माध्यमातून वापरली अथवा विक्री केली जाऊ नये यासाठी दोन्ही कंपन्यांनी आता थेट एकमेकांच्या सेवा आणि प्रोडक्टवर बंदी घालण्याची टोकाची भूमिका घेतली आहे.
गुगलच्या या निर्णयाबद्दल बोलताना अॅमेझॉनच्या प्रवक्त्यांनी गुगलचा हा निर्णय निराशाजनक आहे. अशाप्रकारे निवडक उपकरणांवर (स्मार्ट स्पिकर्स वापरणारे) युझर्सला एखादी सेवा वापरण्यापासून थांबवणे योग्य नाही. आम्ही गुगलबरोबर चर्चा करुन लवकरात लवकर या वादावर योग्य तो तोडगा काढू असा विश्वास व्हर्ज वेबसाईटशी बोलताना त्यांनी व्यक्त केला.
गुगलच्या या निर्णयावर आता अॅमेझॉन समंजस्याची भूमिका घेत बोलणीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवणार की बंदीवर बंदी हा प्रकार असाच सुरु राहणार हे येणारा काळच सांगेल. मात्र सध्या सुरु असलेल्या गुगल आणि अॅमेझॉन या दोन बड्या कंपन्यांच्या वादात ग्राहक आणि इंटरनेट युझर्सला फटका बसणार आहे. या दोन्ही कंपन्यांमधील वाद वेळीच थांबला नाही तर अॅमेझॉन आणि गुगलच्या सोयी एकाच वेळी वापरता येणार नसल्याचे ग्राहकांना दोन्ही कंपन्यांच्या सोयी अधिक पैसे खर्च करुन वापराव्या लागतील. त्यामुळे आता पुढील काही दिवसांमध्ये याबद्दलचे चित्र आणखीन स्पष्ट होईल मात्र तोपर्यंत गुगलची युट्यूब ही सेवा अॅमेझॉनच्या काही ग्राहकांना वापरता येणार नाही हे निश्चित आहे.