नोटाबंदीनंतर अनेक व्यवहार ऑनलाइन होत असताना गुगलनेही आता यामध्ये प्रवेश केला आहे. विविध प्रकारची पेमेंट अॅप्लिकेशन्स सध्या आघाडीवर आहेत. या स्पर्धेत गुगलने उडी घेतली आहे. गुगल आपल्या या अॅपची घोषणा पुढच्या आठवड्यात करणार आहे. या अॅप्लिकेशनचे नाव कंपनीने जाहीर केले असून, ते ‘तेज’ असे ठेवण्यात आल्याचे नुकतेच जाहीर केले. अॅप्लिकेशनबाबत सविस्तर माहिती कंपनीकडून १८ सप्टेंबर रोजी अधिकृतरित्या जाहीर करण्यात येईल. सध्या ही सुविधा अमेरिकेतील नागरिकांसाठी सुरु असून, आता ती भारतातही सुरु होणार असल्याने त्याबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे.

मोदी सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नागरिकांकडून ऑनलाइन पेमेंटचा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ लागला. या निर्णयानंतर मोबाईल, लॅपटॉप, टॅब यांच्यामार्फत विविध प्रकारची पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले. येत्या काळात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. देशातील लहान गावांमध्येही आता डिजिटल पेमेंटचा पर्याय स्विकारला जात आहे. यामध्ये पेटीएम, फ्रीचार्ज, मोबीक्वीक यासह विविध नामांकित बँकांची एचडीएफसी चिलर, सिटी मास्टरपास, स्टेट बँक बडी, आयसीआयसीआय पॉकेटस अशा अॅप्सची चलती आहे.

भन्नाट! व्हॉट्सअॅप ग्रुपवर चुकून पाठवलेला मेसेज डिलिट करता येणार

गुगलने या पेमेंट सुविधेच्या स्पर्धेत प्रवेश केल्यानंतर ‘तेज’ अॅपला मोठा प्रतिसाद मिळेल, असे मत सर्व स्तरांतून व्यक्त केले जात आहे. तेज अॅप्लिकेशन हे गुगल वॉलेट आणि अँड्रॉईड पे या गुगलच्या सर्व्हिसपेक्षा वेगळे असेल. हे अॅप्लिकेशन युनिफाईड पेमेंट इंटरफेसला (यूपीआय) सपोर्ट करणार असल्याचे कंपनीने सांगितले. गुगल कायमच आपल्या ग्राहकांना विविध सुविधा देऊन खूश करत असते. त्यामुळे गुगलच्या या नवीन अॅपला ग्राहक नेमका कसा प्रतिसाद देणार हे पाहणे विशेष आहे.

Story img Loader